मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू, महिलांना वाढीव 2100 रुपयांची रक्कम मिळणार नाही

2100 रुपयांची घोषणा निवडणुकीच्या आधी करण्यात आली होती. मात्र वाढीव हप्ता देण्याविषयी कोणतीही घोषणा अधिवेशनात करण्यात आलेली नाही.

  • Written By: Published:
Untitled Design 141

Chief Minister’s Ladki Bhain Yojana continues as it is : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही सध्या सर्वाधिक चर्चेत आणि लोकप्रिय योजनांपैकी एक ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेबाबत मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे.

लाडकी बहिण योजनेबाबत मोठी घोषणा

आज विधानसभेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या इंटरनॅशनल वूमेन्स डे निमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही काळजी करू नये. तुमच्या मनातल्या अपेक्षा आम्ही पूर्ण करत आहोत आणि पुढेही करत राहू. फक्त या योजनेच्या विरोधात कोणीही कोर्टात जाऊ नये.”

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्वाचा निर्णय! मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केल्या चार नव्या योजना

लाभार्थी महिलांना KYC अपडेट करण्याचे आवाहन

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नव्हता. काही लाभार्थी महिलांचे तीन महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते. आता मात्र सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांच्या खात्यात एक-दोन दिवसांत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

तथापि, अनेक महिला पात्र असूनही त्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अशा महिलांनी तातडीने KYC अपडेट करून घ्यावी, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांसाठी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असून आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवली जाणार आहे.

Tags

follow us