‘पीएचडी म्हणजे नोकरीची हमी नाही’, कौशल्याधारित शिक्षणावर भर देत सतीश चव्हाणांचा तरुणांना सल्ला

सतीश चव्हाण यांनी मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप, पदवीधरांच्या रोजगाराच्या समस्या आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर सविस्तर भाष्य केले आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 08T142613.692

Satish Chavan’s advice to the youth : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सतीश चव्हाण यांनी मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप, पदवीधरांच्या रोजगाराच्या समस्या आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर सविस्तर भाष्य केले आहे. बीड-पुणे रेल्वे सुरू होणे हा मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगताना चव्हाण म्हणाले की, केवळ रोजगारासाठी युवकांनी बाहेर स्थलांतर करू नये, तर बाहेरील उद्योग आणि रोजगाराच्या संधी मराठवाड्यात याव्यात, हा आपला प्रयत्न आहे.

बीड, धाराशिव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव तसेच विदर्भाला जोडणारे रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागात उद्योगांना चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठवाड्यात बजाज किंवा हुंडाईसारखे मोठे उद्योग प्रकल्प आले तर युवकांचे स्थलांतर थांबू शकते, असेही ते म्हणाले. मात्र कोणताही बदल एका दिवसात होत नाही. रेल्वे आणि दळणवळणाच्या सुविधा वाढल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम काही वर्षांत दिसतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पदवीधरांच्या रोजगाराबाबत बोलताना सतीश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या नैराश्याबद्दल चिंता व्यक्त केली. पीएचडी किंवा उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीची हमी राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात सध्या सुमारे पाच हजार प्राध्यापक पदे रिक्त असली तरी पीएचडी केलेल्या उमेदवारांची संख्या लाखोंमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्राध्यापकाची नोकरी मिळणे शक्य नाही. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी किंवा पीएचडीपुरते मर्यादित न राहता कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगारक्षम प्रशिक्षणावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘क्रांतिवीर’ पडद्यावरचे, देशभक्ती रक्तातली, नाना पाटेकरांच्या धाडसी देशभक्तीचा पराक्रम

विद्यापीठ स्तरावर कौशल्य विकासासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याची माहिती देताना चव्हाण यांनी मंगलप्रभात लोढा आणि चंद्रकांत पाटील यांच्या सहभागातून अहवाल तयार होत असल्याचे सांगितले. या अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी नवीन रोजगाराभिमुख धोरणे आखली जातील, असेही ते म्हणाले. मराठवाड्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना त्यांनी प्रत्येक महाविद्यालयात एमए आणि एमएससी अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद केले. अनेक संस्थांकडे पुरेसे संसाधन आणि अनुभवी प्राध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनीच पदव्युत्तर शिक्षण घ्यावे आणि इतरांनी पदवी पूर्ण होताच कौशल्याधारित क्षेत्रात करिअरच्या संधी शोधाव्यात, असे मत त्यांनी मांडले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना सतीश चव्हाण यांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. 1972 च्या दुष्काळापेक्षाही मोठी परिस्थिती असल्याचे जाणकार सांगत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीतील आपल्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना सतीश चव्हाण म्हणाले की, हा मतदारसंघ विधानसभा किंवा लोकसभेप्रमाणे नसून मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्येक निवडणूक जिंकल्यानंतर पुढील सहा वर्षांच्या कार्यकाळात पुन्हा पुढील निवडणुकीची तयारी सुरू असते. गेल्या १८ वर्षांत मराठवाड्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि विविध समाजघटकांशी संपर्क ठेवला असून त्याच कामाच्या बळावर मतदार पुन्हा संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

वय वाढेल तसे काही पुढारी अधिकच वेड्यासारखे वागतात, इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चर्चेचा विषय

महायुतीने योग्य उमेदवाराला संधी दिल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्रिपदाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना सतीश चव्हाण यांनी सांगितले की, प्रत्येक आमदाराला मंत्री होण्याची इच्छा असते. मात्र स्वतःला मंत्रिपदाची हाव नसून पक्ष नेतृत्वाने जबाबदारी दिल्यास ती सक्षमपणे पार पाडण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि विकासकामेही झाली. मात्र लोकशाहीत मतदारांनी दिलेला कौल अंतिम असतो आणि तो आपण स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारांना आवाहन करताना सतीश चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यात जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था याव्यात, कौशल्याधारित शिक्षणाचा विस्तार व्हावा आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. गेल्या 18 वर्षांतील कामगिरीच्या आधारे चौथ्यांदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील ही निवडणूक यंदा विशेष चर्चेची ठरत असून सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणांना वेग आला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून ते चौथ्या विजयासाठी मैदानात उतरले असून त्यांच्या विरोधकांकडूनही जोरदार आव्हान उभे केले जात आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील ही लढत आगामी काळात अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

follow us