Marathwada Rain Update : मराठवाडा विभागात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर व कामगारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची योग्य दखल शासनाकडून घेतली जात नसल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी ही बाब मांडली. त्यांनी शासनाने दिलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका करत, त्वरित ठोस उपाययोजना न झाल्यास मराठवाडाभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
अतिवृष्टीमुळे झालेली (Marathwada Rain) हानी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये जमिनी खरवडून गेल्यामुळे शेतकरी पिकविण्यायोग्य जमीन गमावून बसले आहेत. गावागावांत पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर पडले असून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे, तर पाळीव जनावरेही वाहून गेली आहेत. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना या परिस्थितीमुळे खाजगी सावकारांच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. यामुळे शेतकरी व कामगारांची आर्थिक अवस्था अधिकच बिकट होणार असल्याचे डॉ. नवले (Ajit Navale) यांनी नमूद केले.
1. ओला दुष्काळ जाहीर करावा.
2. शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये पीकनुकसान भरपाई देण्यात यावी.
3. रोजगार गमावलेल्या शेतमजुरांना व ग्रामीण-शहरी कामगारांना प्रति कुटुंब 30 हजार रुपये श्रमनुकसान भरपाई मासिक स्वरूपात द्यावी.
4. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी लागू करावी.
5. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पूर्वी अस्तित्वात असलेल्या
पेरणी न होण्याची स्थिती (Prevented Sowing),
प्रतिकूल हवामान (Mid-season adversity),
स्थानिक आपत्ती (Local Calamity),
कापणी पश्चात आपत्ती (Post-Harvest Calamity) या सर्व तरतुदी पुन्हा लागू करून योजना शेतकऱ्यांच्या खऱ्या फायद्याची बनेल अशा पद्धतीने सुधारावी.
6. अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुल, बंधारे, तलाव, वीज वितरणाचे रोहित्र व खांब यांच्या दुरुस्तीकरिता विशेष कार्यक्रम राबवावा.
7. ज्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना बाजारभावानुसार मोबदला द्यावा.
8. शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे वाहून गेलेले पशुधन यासाठी बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी.
9. घर व गोठ्यांची पडझड झालेल्या नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी.
10. शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पदवी व व्यावसायिक शिक्षणाची फी माफ करावी.
डॉ. नवले शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय मिळवण्यासाठी ” वरील मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन, महाराष्ट्र अखिल भारतीय शेतमजूर यूनियन, महाराष्ट्र च्यावतीने 30 सप्टेंबर 2025 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील सर्व शेतकरी, कामगारांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. नवले यांनी केले.
मोठी बातमी : अभिनेता विजय यांच्या रॅलीतील चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू
शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या प्रश्नांवर गप्प बसणार नाहीत असे नवले यांनी शासनाला ठणकावून सांगितले. या पत्रकार परिषदेला माकप जिल्हा सचिव ऍड. कॉ. भगवान भोजने, कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, ऍड. सचिन गंडले, कॉ. प्रकाश पाटील, सीटूचे कॉ. अजय भवलकर, कॉ. भाऊसाहेब झिरपे, कॉ. लोकेश कांबळे, कॉ. अरुण मते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.