Download App

बीडमध्ये गायीनं पीक खाल्ल्यानं तरुणाची विष पाजून हत्या

बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा पाचेगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोर ठेवलेले तुरीचे पीक गायीने खाल्ल्यान एकास तिघांनी मारहाण करून विष पाजले होते. त्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी गेवराई ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. विकास गणेश जाधव (वय 25. रा. वसंतनगर तांडा, पाचेगाव) असे मयताचे नाव असून, रामेश्वर शंकर राठोड, विकास शंकर राठोड आणि अनुसया रामेश्वर राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताची आई चांगुबाई गणेश जाधव (वय 45 वर्ष) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 4 जानेवारीला दुपारी 4 वाजता घरी असताना रामेश्वर राठोड, विकास शंकर राठोड व रामेश्वर याची पत्नी अनुसया हे घरासमोर आले. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ देण्यास सुरवात केली.

दरम्यान रामेश्वर राठोड थेट घरात घुसला आणि टीव्ही पाहत बसलेल्या चांगुबाई यांचा मुलगा विकास जाधवला पकडून त्याला ओढत बाहेर आणलं. तसेच तुझ्या गायीने आमच्या दारातील तुरीचे पिकाची थप्पी खाल्ली आहे. आमचे खुप नुकसान झाले आहे. असे म्हणून त्यास मारहाण करु लागला.

रामेश्वर हा विकासला मारहाण करत असतानाच रामेश्वर याची पत्नी अनुसया त्याच्या घराकडे पळत गेली आणि पिकावर फवारण्याचे विषारी औषध घेऊन आली. यावेळी शंकर राठोड व रामेश्वर राठोड यांनी विकासला खाली जमनीवर पाडले.

तर अनुसया राठोड हिने हातातील औषधाची बॉटल उघडुन बळजबरीने विकासच्या तोंडात ओतली. त्यामुळे विकासच्या आईने आरडाओरडा केल्याने विकासची पत्नी आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी धाव घेतली. त्यानंतर मारहाण करणारे राठोड कुटुंब तेथून निघून गेले.

विकासला विषारी औषध पाजल्याने त्याची तब्येत बिघडू लागली होती. त्यामुळे वस्तीवरील राहुल वसंत राठोड व अमोल याने त्याला बीड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह बीड येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तर विकासच्या आईच्या तक्रारीनंतर गेवराई पोलिसात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीनही आरोपी फरार झाले असून, पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Tags

follow us