Download App

17 दिवसानंतर जरांगेंचं उपोषण मागे; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘या सर्व बाबतीत अतिशय….’

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis Reaction On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याचं सुरू असलेलं उपोषण आज अखेर त्यांनी मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवालीत जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. माझ्यावर विश्वास ठेव, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं आश्वासन सीएम शिंदेंनी जरांगे पाटलांना दिलं. त्यामुळं जास्त आढेवेढे न घेता जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांनी ट्वीट करत लिहिलं की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नशील राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुध्दा. सुप्रीम कोर्टात ते का टीकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही.

त्यांनी लिहिलं की, सारथी, छत्रपती राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. आजही या सर्व बाबतीत अतिशय वेगाने काम सुरू आहे. भविष्यातसुध्दा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.

दरम्यान, मागील सरकारनेही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारचीही भूमिका आहे. लाठीचार्जमध्ये गावकऱ्यांवरचे सर्व गुन्हे मागे घेणार आहे. तसेच कोणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण दिले जाईल. लाठीचार्ज करणाऱ्या दोषींचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. एकनाथ शिंदे देखील गरीब कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता आहेत. माझ्या पोटात एक आणि ओठावर एक, रद्द झालेलं आरक्षण मराठा समाजाला देण्याची भूमिका असल्याचं सीएम शिंदे यांनी सांगितलं.

काय आहेत मनोज जरंगे यांच्या मागण्या?

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. जीआरमधील वंशावळीचा उल्लेख काढून टाकावा. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. सक्तीच्या रजेवर पाठवणे हा उपाय नाही. ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली होती. या मागण्यांवर ते ठाम होते. त्यामुळेच त्यांचे उपोषण दीर्घकाळ चालले.

Tags

follow us