औरंगाबाद : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad byelection) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केली आहे. कलाटे यांचं मन वळविण्यात मविआ नेत्यांना यश आले नाही. शिवसेनेतील बंडखोरीबद्दल अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. ”या बंडखोरीमागे तिसराच कोणीतरी असल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला”.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पैठण दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, शिवसेनेमध्ये जी बंडखोरी झालेली त्याविषयी माझ्या माहितीनुसार आदित्य ठाकरे सोमवारी तिथे येणार आहेत. सचिन अहिर देखील बंडखोरी मागे घेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण बंडखोरी करण्यामागचा सूत्रधार कोणतरी तिसरीच व्यक्ती आहे. कारण बंडखोरी झाल्यामुळे मताची विभागणी होऊन त्याचा फायदा इतर पक्षाला व्हावा म्हणून देखील कोणीतरी हे करण्याचा प्रयत्न केला असावा असा माझा अंदाज आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले, मी तिथे गेल्यावर स्वतः या सर्व गोष्टींची माहिती घेईनच आणि हे जरी कोणी केलेलं असेल तर स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना हे स्पष्टपणे त्यांच्या मतदारांना आव्हान करतील आणि विश्वास देतील की तिन्ही पक्षांचा आणि मित्र पक्षांचा मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आहेत आणि त्यांनाच मतदान करावे असे आवाहन ते करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.