Download App

धक्कादायक! नायलॉन मांजानं कापला विद्यार्थ्याचा गळा

औरंगाबाद : नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यातच औरंगाबादमधून एका विद्यार्थ्याचा नायलॉन मांजानं गळा कापल्याची घटना समोर आली आहे. नायलॉन मांजावर नियंत्रण आणण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापणा करण्यात आली, मात्र पथक त्यामध्ये अपयशी ठरत असल्याचं दिसून येतंय. औरंगाबादमध्ये जेवणाचा डब्बा घेऊन जात असलेल्या एका विद्यार्थ्याचा गळा नायलॉन मांजाने कापल्याची घटना समोर आलीय. चैतन्य शंकर मुंढे (वय.19) रा.गंगाखेड परभणी, हल्ली मु. बेगमपुरा औरंगाबाद असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चैतन्य बारावीच्या शिक्षणानंतर नीटची तयारी करण्यासाठी मामाकडं राहायला गेला आहे. आज सकाळी जेवणाचा डबा घेण्यासाठी चैतन्य बेगमपुऱ्यामधून विद्यापीठ गेटकडं चालला होता. गाडीवरुन जाताना अचानक विद्यापीठाजवळ त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा लागला. त्यातचं चैतन्य जखमी झालाय. त्याचा सात आठ इंच गळा कापला गेलाय. त्यानं गाडी थांबवून पाहिलं तर त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली. सुदैवानं त्याच्या गाडीचा वेग कमी असल्यानं काही अनर्थ घडला नाही. त्यानं तात्काळ मामाला सांगितलं. त्यानंतर मामा सुदर्शन लटपटे यांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

नायलॉन मांजावर बंदी असूनही औरंगाबाद शहरामध्ये राजरोसपणे नायलॉन मांजाची विक्री केली जातेय. त्यामुळं अशा लोकांवर कारवाईसाठी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी नायलॉन मांजा विक्री थांबवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचं एक विशेष पथक तयार केलंय. त्या पथकाकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं. असं असताना देखील शहरात ठिकठिकाणी नायलॉन मांजाविक्री केला जात आहे. त्यामुळं पोलिसांकडून ठोस कारवाई कधी केली जाणार असा सवाल उपस्थित केला जातोय.

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात ग्रामीण पोलिसांकडून देखील विशेष पथकाची स्थापना केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व 23 पोलीस ठाण्यांमध्ये नायलॉन मांजाविरोधात कारवाई करणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलेय. असं असलं तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजा विक्री सुरु असल्याचं समोर आलंय.

Tags

follow us