Dadasaheb Khindkar Arrested : स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिंडकर याच्यासह आठ जणांवर कट रचून अपहरण करणं, जिवे मारण्याचा प्रयत्न करणं या कलमांखाली पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी दादासाहेब खिंडकर गुरुवारी (ता. १३) पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण आला. (Khindkar) त्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी त्याच्यासह ज्योतिराम भटे या दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ता. २३ जानेवारी २०२४ रोजी ओमकार ज्ञानोबा सातपुते या तरुणाला दादासाहेब खिंडकर, आकाश दळवे (रा. बेलवाडी), पप्पू घुले (रा. केज), सोन्या चव्हाण, ओंकार घुले (रा. केज), ज्योतिराम भटे (रा. बाभुळवाडी), ऋषिकेश जाधव (रा. गेवराई) व संजय बावणे (रा. वाहेगाव आम्ला) या आठ जणांनी अपहरण करून मारहाण केली होती.
धनंजय देशमुखांच्या साडूचा कारनामा उजेडात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस गुन्हा दाखल करणार
मारहाणीचा व्हिडिओ बुधवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रात्री उशिरा पिंपळनेर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला. दादासाहेब खिंडकरवर दाखल केलेला गुन्हा मागे का घेत नाही, या कारणावरून ओमकार सातपुतेचे पुणे येथून अपहरण करत त्याला बीडला आणण्यात आले. त्यानंतर दादासाहेब खिंडकर याच्या स्कॉर्पिओ जिपमध्ये (एमएच-२३, बीसी-०९९९) बसवत निर्जनस्थळी नेत जबर मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावरून कट रचून अपहरण व जिवे मारण्याचा प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा नोंद झाला.
दादासाहेब खिंडकर व ज्योतिराम भटे या दोघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मधुसूदन घुगे यांनी दिली. दरम्यान, या प्रकारानंतर आता जिल्ह्यात पुन्हा एकदा मारहाण आणि तत्सम गोष्टींबाबत समाज माध्यमांवर टीका टिपण्णीचे सत्र सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दादा खिंडकर हा वाल्मीकपेक्षा मोठा गुंड आहे. त्याच्या डोक्यावरही धनंजय मुंडे यांचा हात होता, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह पंडित यांच्या जीवावर दादा खिंडकर याने आतापर्यंत दादागिरी केली. त्याची गावात मोठी दहशत आहे. दादा खिंडकर टोळी चालवतो. बेलवाडी गावात मतदानाचा अधिकार नाही. स्वतः बटण दाबतात आणि फ्कत बोटाला सही लावली जाते. नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली जाते, असा आरोप परमेश्र्वर सातपुते यांनी पत्रकार परिषदेत केला.