Beed Crime News : पोलिसांचं काम काय सोप्याच शब्दांत सांगायचं झालं तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं. पण जर हेच समाजाचे रक्षक म्हणवणारे पोलीस लोकांना मनस्ताप देणारे काम करू लागले तर.. पोलीस दलाची नाचक्की होईल असे उपद्यव्याप करू लागले तर.. चोरी करू लागले तर.. ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण हेच सत्य करणाऱ्या घटना घडत आहेत. ताजी घटना बीड जिल्ह्यातील आहे. रमी, ड्रीम 11 सारख्या अॅपमध्ये पैसे हरल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने चक्क चोरी करण्याचे उद्योग सुरू केले. अमित मधुकर सुतार असे त्याचे नाव असून तो बीड पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. दुचाकी चोरीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
इन्वर्टसाठी लागणाऱ्या 10 बॅटऱ्या चोरी प्रकरणी बीड पोलीस ठाण्यात मागील वर्षी गुन्हा दखल झाला होता. या घटनेला वर्षही उलटत नाही तोच सुतारने नवा कारनामा केला. दोन साथीदारांच्या मदतीने थेट दुचाकी वाहनांवरच डल्ला मारला. सात दुचाकींची चोरी केली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या चोराला गजाआड केलं आहे.
काय सांगता! चक्क पोलिसच निघाला चोर; जळगाव पोलिसांनी अटक करुन फोडलं बिंग
Lost in Rummy & Dream11, turned into a thief! 🚨
Meet ASI Amit Sutar from Beed – once wore the khaki, now stealing bikes!
First, he looted 58 batteries from the SP office itself… now caught red-handed stealing 7 two-wheelers with accomplices.
Online gambling + addiction + debt =… pic.twitter.com/SUKxgtFZqN— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 9, 2025
याआधी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटऱ्यांची चोरी झाली होती. ही चोरी सुतारनेच केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अमित सुतारला निलंबित केले होते. सध्या तो जामीनावर बाहेर होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याच्या वागणुकीत काही फरक पडला नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याला ऑनलाइन जुगार, दारू आणि गेम खेळण्याचा छंद होता. यात त्याने हजारो रुपयांची गुंतवणूक केली होती. इतकेच नाही तर त्याने लोकांकडून कर्जही घेतले होते.
हेच कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबला होता. चोरीच्या प्रकरणातच जेलची हवा खावी लागली होती. आता पुन्हा असे कृत्य नको असा विचार त्याने केला नाही. कर्जाचे पैसे तर परत करायचे होते. यासाठी त्याने पुन्हा चोरीचाच मार्ग निवडला. सुतार याने शहर हद्दीतून दुचाकी चोरल्या होत्या. या दुचाकींची विक्री करण्यासाठी त्याने दोघांची मदत घेतली होती.
हीच माहिती एलसीबीला मिळाली आणि त्यांनी सापळा रचून तिघांनाही बेड्या ठोकल्या. सुतारने तीन दुचाकी स्वतःच्या घरी तर चार दुचाकी मित्रांकडे लपवल्या होत्या. नंतर त्याला सोमवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यातील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे शहर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने अमित सुतार याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बीड जिल्ह्यात महिन्यातच दुसरी घटना; सावकारी जाचाला कंटाळून एकानं आयुष्य संपवलं