Download App

मोठी बातमी! बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला पुन्हा अटक; थेट दिल्लीतून घेतलं ताब्यात

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले (Ranjit Kasale) यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

Beed News : बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले (Ranjit Kasle) यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. रणजित कासलेला थेट दिल्लीतून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. कासलेविरुद्ध कालच दोन गुन्हे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. इतकेच नाही तर मुंबईतही कासलेविरुद्ध गुन्हा दाखल आहे.  कासलेंना पुन्हा का अटक करण्यात आली याचीही माहिती समोर आली आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेंना अटक करण्यात आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने (Mumbai Crime Branch) त्याला थेट दिल्लीतून अटक केली. यानंतर पोलिसांनी कासलेला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला दोन दिवसांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत रवानगी केली. याआधी रणजित कासलेवर बीड, परळी, अंबाजोगा आणि मुंबईत गुन्हे दाखल आहेत. आता नव्याने गुन्हे दाखळ झाले आहेत. यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच पोलिसांनी अटकही केली आहे. विशेष म्हणजे कासलेला एक आठवड्यापूर्वीच जामीन मिळाला होता.

निलंबित PSI रणजित कासलेंचा दुसरा व्हिडिओ; थेट मंत्र्याचं नाव अन् फोटो दाखवत गंभीर आरोप

यानंतरही त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड आणि शेअर करण्याचे काम सुरुच ठेवले होते. शनिवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यातही त्याने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. कराडला तुरुंगात खास चहा दिला जातो. जेवणात चांगल्या दर्जाच्या चपात्या असतात. इतकेच नाही तर तो स्वतः अन्य कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कँटीनमधून दरमहा 25 हजार रुपयांची खरेदी करत असल्याचा दावा त्याने केला होता. या दाव्यानंतर कारागृह अधीक्षकांची बदली करण्यात आली.

कासलेवर बीडमध्ये दोन गुन्हे

बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात कासलेवर वेगवेगळ्या तक्रारींवरुन दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते मोहन आघाव यांनी तक्रार दिली होती. यानंतर सामाजिक शांतता भंग केली, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मीडियाद्वारे केल्याच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात गुन्हे दाखल करुन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

follow us