Beed News : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई.. नाव चर्चेत आहे. बीडमधल्या शिरुर कासार तालुक्यात खोक्या पार्टीची दहशत आहे. नोटांची उधळपट्टी, बॅटने बेदम मारहाण अन् हेलिकॉप्टरने एन्ट्री असे एक एक करत व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या सगळ्याच व्हिडिओंच्या सेंटरला आहे सतीश भोसले. परळी शेजारच्याच शिरुर कासार या पट्ट्यात या नावाची दहशत आहे. शिरुर कासार परिसरात त्याची खोक्या पार्टी नावाने दहशत आहे. खोक्या पार्टी, गोल्ड मॅन या टोपण नावाने तो ओळखला जातो. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून नावारुपास आलेला हा सतीश भोसले आहे तरी कोण? त्याचे नेमके काय कारनामे आहे? त्याला अटक करण्याची मागणी का होत आहे? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊ यात..
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने बीड जिल्हा राज्याच्या नकाशावर ठळक झालाय. या जिल्ह्यात गुन्हेगारी किती फोफावली आहे याची माहितीही समोर आली आहे. जिल्ह्यातील या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनामोर असतानाच आता याच बीड जिल्ह्यात सतीश भोसलेची गुन्हेगारी कृत्ये तोंडोतोंडी आली आहेत. सतीश भोसले नेमका कसा चर्चेत आला याची आधी माहिती घेऊ..
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी मारहाणीचे व्हिडिओ शेअर केले होते. शिरुरकासार तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण झाली होती. यानंतर अन्य ठिकाणच्या मारहाणीचेही व्हिडिओ बाहेर आले. त्यानंतर कारमध्ये नोटा उधळत असल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका आलिशान कारमध्ये पुढील सीटवर बसून नोटा उडवणारा सतीश भोसले या व्हिडिओत दिसत आहे. अन्य एका व्हिडिओत सतीश भोसले हेलिकॉप्टरने प्रवास करताना दिसत आहे. याच सतीश भोसलेचा बॉस आमदार सुरेश धस आहेत.
बीडच्या खोक्या भाईला हरीण अन् मोरांच्या शिकारीचा नाद, विरोध करणाऱ्याला बेदम मारलं, जबडा मोडला
सतीश भोसले हा बीड जिल्ह्यातील शिरुर जवळच्या वस्तीवर राहतो. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. परंतु, सतीश भोसले मात्र महागड्या गाड्या आणि सोन्याचे ब्रेसलेट वापरतो. मागील पाच ते सात वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा सतीश भोसले कट्टर कार्यकर्ता आहे. शिरुर कासार परिसरात त्याची खोक्या पार्टी नावाने दहशत आहे. खोक्या पार्टी, गोल्ड मॅन या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने अनेकांना मारहाण करुनही त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी कुणी पुढे येत नाही.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला हरीण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता. खोक्याने आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरिणांना मारल्याचं आजूबाजूच्या गावचे लोक सांगतात. याशिवाय डोंगरात वागूर (पक्षी पकडण्याचे जाळे) लावून कित्येक मोरही खाल्ले आहेत. आठ दिवसांपूर्वी सतीश भोसले आणि त्याचे सहकारी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरणं पकडत होते. त्यावेळी दिलीप ढाकणे यांनी त्यांना हरणं पकडण्यास मज्जाव केला. तेव्हा खोक्या भाई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली.यामध्ये दिलीप ढाकणे यांचे 8 दात पडले आहेत आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. ढाकणे यांच्या मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला. पण याच खोक्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. कारण बावीकर धाडस करून समोर आले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हा मुद्दा उचलत सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सुरेश धस म्हणाले की माझा त्याचा विशेष संबंध नाही. त्याच्यावर कारवाई व्हायची असेल तर होईल. पण मला इतकच सांगायचं आहे सतीश भोसले हा सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे.
सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे ही गोष्ट मी नाकारत नाही. मी परत एकदा सांगतो ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्याने जर पुढे येऊन फिर्याद दिली तर यावर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे. कोण कुणाला बॉस म्हणतो या प्रत्येकाची माहिती ठेवता येत नाही. पण तो (सतीश भोसले) जर मला बॉस म्हणत असेल मी जरी त्याचा बॉस असेल तरी आता बॉसच म्हणतोय की त्याच्यावर कारवाई झालीच पाहीजे असे भाजप आमदार सुरेश भोसले यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.