Download App

भाजप नेत्याच्या पुतण्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

  • Written By: Last Updated:

बीड : माजलगाव येथील भाजपा नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप यांचा रात्री बीड येथील गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडला आहे.

माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप (वय २२) हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून माजलगावकडे येत असताना गेवराईजवळ त्यांच्या गाडीने कंटेनर ला पाठीमागून जोरदार धडक दिली. शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

या अपघातात विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विश्वजीत जगताप यांच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अन्य एक जण जखमी असल्याचे देखील समजत आहे.

दरम्यान हा अपघात घडला, त्यावेळी विश्वजित जगताप हे स्वतः गाडी चालवत होते. मात्र त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्याने त्यांना जबर मार लागला आहे. तर त्यांच्या बाजूच्या सीटवर असलेल्या आर्यन कंटुले यांनी सीट बेल्ट लावला असल्याने ते या अपघातातून बचावले असल्याचे सांगितले जात आहेत.

Tags

follow us