बीडमध्ये दुष्काळाचा विळखा घट्ट; शेतकरी संकटात, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Beed Drought Crisis : दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि रोजगाराचा अभाव यामुळे बीडमधील शेतकरी संकटात, आत्महत्यांच्या घटनांची शक्यता.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 25T143411.414

Beed Drought Crisis : बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचे जगणे अधिकच असह्य होत चालले आहे. पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव, शेतीतून मिळणारे शून्य उत्पन्न, जनावरांच्या चाऱ्याची चिंता आणि वाढते कर्ज अशा अनेक संकटांनी शेतकऱ्यांना घेरले आहे. या परिस्थितीत जगण्याचा आधारच हरवत चालल्याचे चित्र असून, शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी जिल्ह्यातील परिस्थितीचे गांभीर्य पुन्हा अधोरेखित केले आहे.

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग परिसरातील भंडगवाडी येथील 56 वर्षीय शेतकरी बाबुराव रंगनाथ वाघमोडे यांनी मंगळवारी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, अवघ्या 24 तासांत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर आल्याने ग्रामीण भागातील चिंतेत भर पडली आहे. या घटनांमागील नेमकी कारणे तपासानंतर स्पष्ट होतील; मात्र सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कुटुंबांसमोर निर्माण झालेली संकटे दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

जिल्ह्यातील दुष्काळाची झळ केवळ शेतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. विहिरी आटल्या असून, पिके पाण्याअभावी करपली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आणि शेतमजुरांना उदरनिर्वाहासाठी ऊसतोडीसारख्या कामांसाठी कुटुंबासह स्थलांतर करावे लागत आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराने उघड केला 13 कोटींचा महा’वितरण घोटाळा; भाजप आमदाराच्या मतदारसंघाचाही उल्लेख

या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम अल्पभूधारक आणि शेतीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या कुटुंबांवर होत आहे. हाताला काम नसल्याने रोजचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. दुसरीकडे, शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता कायम आहे. आर्थिक अडचणींसोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भविष्याची अनिश्चितता यामुळे अनेक कुटुंबे मोठ्या तणावाखाली जगत आहेत. अशा वेळी त्यांना केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता आहे.

दुष्काळ निवारणासाठी शासनाकडून विविध उपाययोजनांची घोषणा केली जाते. प्रशासकीय बैठका, आढावा आणि मदतीचे नियोजनही केले जाते. मात्र या सगळ्याचा प्रत्यक्ष लाभ गावपातळीवर किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो, याचे उत्तर शोधण्याची गरज आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, रोजगाराची उपलब्धता आणि आर्थिक मदत या मूलभूत बाबी वेळेत उपलब्ध होत नसतील, तर योजनांच्या घोषणांचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबतही नागरिकांकडून गंभीर तक्रारी केल्या जात आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी उपलब्ध होणारे धान्य, आर्थिक मदत आणि विविध योजनांचा निधी यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनाच मिळतो का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी अनियमितता आणि निधीच्या गैरवापराचे आरोप होत असताना प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मदतीच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसेल, तर गरजू शेतकऱ्यांपर्यंत दिलासा पोहोचणार कसा, हा प्रश्न कायम राहतो.

या संपूर्ण परिस्थितीत जिल्ह्यातील प्रशासनावर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण कितपत आहे, याचीही चर्चा होणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्त गावांचा नियमित दौरा करून तेथील अडचणी जाणून घेणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे आणि योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासणे ही लोकप्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र राजकीय कार्यक्रम आणि इतर कामांमध्ये व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अपेक्षित प्राधान्य दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडल्यानंतर केवळ पंचनामे आणि आकडेवारीपुरती प्रशासकीय यंत्रणेची भूमिका मर्यादित राहता कामा नये. प्रत्येक घटनेमागील सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून पीडित कुटुंबाला तातडीने आधार देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संभाव्य संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी गावपातळीवर प्रभावी यंत्रणा उभी करावी लागेल. आणखी किती शेतकऱ्यांचे जीव गेल्यानंतर शासन आणि प्रशासन ठोस पावले उचलणार, हा प्रश्न आता अनुत्तरित ठेवून चालणार नाही.

follow us