Suresh Dhas on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना बीड जिल्ह्याचं मालकच करून ठेवलं होतं. जर दुर्दैवाने धनंजय मुंडे यांची कडी कुठे जोडली गेली असेल तर ते त्यांच्या दृष्टीने अतिशय दु्र्दैवी ठरेल असं मला वाटतं, असा हल्लाबोल भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला. आमदार धस यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. त्यांनी या मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे.
राष्ट्रवादीतली मुन्नी ही महिला नसून पुरुष; सुरेश धसांचा रोख कुणाकडे?
धस पुढे म्हणाले, धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका असं आम्ही मुख्यमंत्र्यांना त्याचवेळी सांगितलं होतं. पण ते काही घडलं नाही. मागील सरकारच्या काळात मुंडे पालकमंत्री झाल्याचा फटका हा अशा पद्धतीने बसला. हा माणूस उचला, तो माणूस उचला, खंडणी गोळा करा हे असले प्रकार सुरू झाले.
वाल्मिक कराडच्या राजकीय टार्गेटवर तुम्ही होतात का या प्रश्नाचं उत्तर देताना धस म्हणाले, राजकीय टार्गेटवर नाही पण त्याच्यानंतर मी त्यांच्या टार्गेटवर आलो. सगळ्या कंपन्यांचे लोक एकदा माझ्याकडे आले. त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. नंतर मी धनंजय मुंडेंना भेटलो त्यांना सांगितलं की बीड जिल्हा काय तुमची मालकी नाही. जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं म्हणजे आम्ही जिल्ह्याचे बापच झालो असं त्यांना वाटायला लागलं.
मी त्यावेळी आमदार नसल्याने त्यात फारसं लक्ष घालत नव्हतो. पण ज्यावेळेस मला यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाचा फोन आला. बाकीच्या कंपन्यांचे फोन आले त्यावेळी त्यात लक्ष घालणं ही माझी जबाबदारी होती. लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे केलं. तिकडं धनुभाऊ आणि पंकजाताई एकत्र आले. आम्हाला आनंदच झाला. पंकजाताईंना राग येईल म्हणून मी कधी धनंजय मुंडेंना भेटत सुद्धा नव्हतो असेही धस यांनी सांगितले.
2019 च्या विधानसभा निवडणुकी भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळालं होतं. पण आमचं भरलेलं ताट दुसरे घेऊन गेले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला खूप त्रास झाला. माझ्यावर बरेच गुन्हे दाखल झाले. मधल्या अडीच वर्षांच्या काळातलं गुन्हे दाखल करणारंच सरकार होतं. त्या अडीच वर्षांच्या काळात मला प्रचंड मानसिक त्रास झाला.
तुमचं कुठं आहे आणि लोकांना तुम्ही कुठं लपवून ठेवलं असा आरोप तुमच्यावर होत असतो, याबद्दल विचारलं असता धस म्हणाले, माझं कुठं फार्म हाऊस आहे? कुठंही नाही आणि मी कुठं लोकही लपवून ठेवत नाही. कुणी समोरून आलं तर त्याच्याबरोबर भांडणाची आमची तयारी आहे. फार्महाऊसचं नाही तर लोकांना लपवायचं कुठं? कुणी काहीही बोलतात निदान जी गोष्ट खरी आहे ती तर बोला असा कटाक्ष त्यांनी विरोधकांवर केला.
तुम्हाला आका शब्द अचानक कसा सुचला? यावर नैसर्गिक देणगी आहे दुसरं काय? ‘आका’, ‘आकाचा आका’ हे शब्दही सुचले कारण थोडसं वाचन आहे माझंही आहे. ‘मुन्नी’ हा शब्दही असाच आला. राष्ट्रवादीची जी मु्न्नी आहे त्या मुन्नीलाही माहिती आहे. त्या मुन्नीलाही पक्कं माहिती आहे की हा मलाच म्हटला आहे. इतकंच काय तर मी एकदा त्यांना मुन्नी म्हणून बोललो देखील होतो असेही सुरेश धस म्हणाले.