जालना : गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंसह (Pankaja Munde) पक्षाची बदनामी करणारे काही लोक आमच्याच पक्षात आहेत, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला आहे.
काल बीडमधील (Beed) भाजपच्या कार्यक्रमाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर बावनकुळेंनी हे वक्तव्य केले आहे.
बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये पंकजाताईंना आणि पक्षाला बदनाम करणारी एक युनिट आहे. ती अशाप्रकारची कामे करते. उलट कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात माझ्यानंतर त्या बोलल्या. मी त्यांना प्रथम स्थान दिले.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे स्वतः मराठवाड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान त्यांनी जालना येथे देखील प्रचार सभा घेतली. यावेळी प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
दरम्यान, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बीड येथे झालेल्या प्रचारसभेत पंकजा मुंडे भाषण करण्यासाठी उठल्या असता त्यांना थांबवून बावनकुळे यांनी थांबवत स्वतः आधी भाषण केले.
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्याला आधी भाषण करण्याची विनंती केली. पण आपण आधी करणार असे म्हणत बावनकुळे यांनी भाषण केले. या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तर यावरच बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला. पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय नेत्या असून, त्यावर अपमान समजणे हास्यास्पद आहे.