Jalna Maratha Protest : मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यानंतर जालन्यात आता आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळं सोमवारी (दि. 4) सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी केशव नेटके (Keshav Netke) यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर परिस्थिती चिघळली असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर जालन्यात अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. दुसरीकडे, आंदोलक आणि पोलिस दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये जखमी झाले. या घटनेचा संपूर्ण राज्यात निषेध होत आहे. काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे, तर अनेक ठिकाणी हिंसक आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत जालना जिल्ह्यात १६ बसेस जाळण्यात आल्या. परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश दिले.
जमावबंदीच्या आदेशामुळं जालन्यात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विविध संघटनाकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, रास्ता रोको आणि राजकीय दृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोप पक्षात घेता कलम (३७) १ अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या, बंदूक, तलवारी, भाले, चाकू आणि शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तू बाळगता येणार नाहीत.
‘माझं तोंड उघडलं तर मातोश्रीची दारं उघडणार नाहीत’; नारायण राणेंनी भरला दम
तसेच दगड एकत्रित करून करून ठेवता येणार नाही, जवळ बाळगता येणार नाहीत. याशिवाय व्यक्ती किंवा त्याच्या प्रतिकात्मक शवाचे प्रदर्शन करता येणार नाही. भाषणातून कोणाच्याही भावना दुखावता येणार नाहीत. गाणे किंवा वाद्याच्या माध्यामातून कोणाच्याही भावना दुखावता येत नाहीत. आवेशपूर्ण भाषण, अंगविक्षेप, अराजक माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणापत्रे वस्तू बाळगता येणार नाहीत.
दरम्यान, जालन्यात संचारबंदी लागू असल्याने 6 तारखेला श्रीकृष्ण जयंती, 7 तारखेला गोपाळकाला आणि 14 तारखेला पोळा तसेच 17 सप्टेंबरला होणारा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका आणि इतर कार्यक्रम रद्द करावे लागतील.