Download App

Devendra Fadnavis : ‘हम तीन साथ तो बनेगी ही’; परभणीत फडणवीसांची सहमती एक्सप्रेस जोरात

Devendra Fadnavis : ‘अजितदादांनी सांगितलं जगात जर्मनी भारतात परभणी. पण, दादा असंही म्हणतात बनी तो बनी नाही तर परभणी. पण, काळजी करू नका हम तीन साथ में आए है आता बनी तो बनी नही बनेगी ही आता ‘बनी’ पण असणार आणि ‘परभणी’ पण असणार’, अशा मिश्कील शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिघांची सहमती एक्सप्रेस वेगात धावत असल्याचे सुचवत विरोधकांना इशारा दिला.

परभणी (Parbhani) शहरात रविवारी शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मिश्कील शब्दांत विरोधकांवर टीका केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘आमचे विरोधक नुसतेच टीका करतात. एक भोंगा सकाळीच सुरू होतो. तर रात्री 10 वाजेपर्यंत दुसरे भोंगे सुरू असतात. माझा यांना सवाल आहे. आमच्यावर पाहिजे तेवढी टीका करा आम्ही टिकेला घाबरत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. पण माझं एकच म्हणण आहे. मी सुद्धा विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षनेता होतो. वर्षानुवर्षे विरोधी पक्षात काम केलं.’

‘समृद्धी’नंतर मराठवाड्याचे भाग्य उजळणार; फडणवीसांची परभणीत मोठी घोषणा

‘ज्यावेळी सरकारवर टीका करायचो त्यावेळी चांगलं काय झालं पाहिजे हे देखील सांगायचो. ते मात्र यांच्याकडं सांगण्यासारखं काहीच नाही. कुठली दिशा असली पाहिजे हे सांगू शकत नाही. काय केलं पाहिजे हे सांगू शकत नाही. पण यांच्यातला एकही नेता विकासावर एकही शब्द बोलत नाही. अरे, तुमच्या भाषणांनी गरीबी दूर होणार नाही. तुमच्या भाषणांनी शेतमजुरांच्या पोटात दोन घास जाणार नाहीत. परिवर्तनात सामील व्हा. बोटं दाखवू नका. आम्ही तुमच्या परिवर्तनासाठी उतरलो आहोत परिवर्तन करून दाखविल्याशिवाय आम्ही तिघं स्वस्थ बसणार नाही’, अशा शब्दांत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

ये तो सिर्फ झांकी, पिक्चर अभी बाकी

राज्य आणि केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच आगामी काळात कोणत्या योजना सुरू केल्या जाणार आहेत याचीही माहिती दिली. महिलांसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या पन्नास टक्के सवलतीच्या स्कीमचा उल्लेख करत ‘ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है’, असे म्हणत सरकार महिला भगिनींसाठी आणखी नवीन योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली.

‘राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे’ : अजित पवारांनी दिले दुष्काळाचे संकेत; शासन लागले तयारीला

मुख्यमंत्र्यांना विनंती रस्ते काँक्रिटचेच करून टाका

‘परभणी शहरातील रस्ते जरा खराब आहेत. काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर दूर उतरवलं. प्रशासनाला वाटलं येथील खराब रस्ते मुख्यमंत्र्यांना दाखवू. पण, मुख्यमंत्र्यांचं परभणीवर प्रेम आहे. मी विनंती करतो की इथल्या मुख्य रस्त्यांना काँक्रिटचेच करा. परभणी जिल्ह्यातील 7 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेत नोंद केली. दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली. पुढील तीन वर्षात हे काम पूर्ण करणार. दहा लाख घरे ओबीसींसाठी बांधणार आहोत. जेवढी घरे मागणार तेवढी घरे देऊ’, असे आश्वासन फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

Tags

follow us