Dharashiv News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार (Millet Bar) देण्यात येतात. धाराशिव तालुक्यातील (Dharashiv News) पाच शाळांमध्ये या बारमध्ये अळ्या सापडल्या आहेत. दोन दिवस हा प्रकार घडला हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अन्न औषध प्रशासनाने तपासणी न करता याचा पुरवठा झाला कसा? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केला.
पनवेल इथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये गर्भवती माता आणि लहान बालकांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट आहे. आहाराचे पाकीट उघडताच त्यात घाण वास येते त्यात मुंग्या असतात. असा पोषण आहार घरी न आणलेला बरा असे लाभार्थींना वाटते. त्यामुळे पोषण आहारात असा भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी. त्यांना काळया यादीत टाकावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष यांनी शासनाने नोंद घेऊन कारवाई करू असे निर्देश दिल्याचे सांगितले.
शालेय पोषण आहारात पुन्हा आढळल्या अळ्या, ‘या’ शाळेतील धक्कादायक प्रकार
जिल्हा परिषदांच्या शाळांत याआधीही असे प्रकार घडले आहेत. शालेय पोषण आहारात किडे, अळ्या सापडल्या आहेत. परंतु, या परिस्थितीत काही सुधारणा होताना दिसत नाही. आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. धाराशिव तालुक्यातील मिलेट बार (एक प्रकारचे खाण्याचे चॉकलेट) मध्ये अळ्या आढळल्या आहेत. तर पनवेलमधील अंगणवाड्यांत गर्भवती महिला आणि लहान मुलांना दिला जाणार पोषण आहार निकृष्ट आढळला आहे. या प्रकारांकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले आहे. आता सरकार यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.