Download App

“..तर उजनीचं हक्काचं पाणी बारामतीला गेलं असतं”, सावंतांनी विरोधकांना फटकारलं

पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे.

Maharashtra Elections 2024 : पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे. जनतेने माजी आमदाराला १५ वर्षे संधी दिली होती. त्यांना दिलेल्या संधीचे सोनं करता आलं नाही. कुठलाच विकास न करता खोटं बोलून त्यांनी पदं उपभोगली. त्यांच्या घराण्याच्या २५ वर्षांच्या सत्ताकाळात जनतेसाठी काय केलं? हेही ते सांगू शकत नाहीत. ही विचारांची लढाई आहे, ही विकासाची लढाई आहे, असे भूम परांडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजीराव सावंत यांनी सांगितले.

मतदारसंघातील प्रचार सभेत डॉ. सावंत बोलत होते. सावंत पुढे म्हणाले, मी मुहुर्ताचा फॉर्म भरला तेव्हाच माझा विजय निश्चित झालेला आहे. मला तुमच्याकडून मताधिक्याची अपेक्षा आहे. मी यवतमाळ येथून विधानपरिषदेचा आमदार झाल्यानंतर ९० दिवसांचा जलसंधारण मंत्री झालो होतो आणि ‘उजनी’चे पाणी आणण्याचे वचन दिले होते. त्या विश्वासावर तुम्ही मला २०१९ ला विधानसभेत पाठवलं.

मी बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असल्याने मला सत्तेची अभिलाषा नाही. जानेवारी २०२० लाच मी भाजपसोबत युती करून ३० जून २०२२ ला धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता आणली होती. शेवटी आम्हाला उठाव करावा लागला व नैसर्गिक सरकार सत्तेवर आणलं. ज्यांच्यासाठी हा सर्व अट्टहास केला, त्या ‘उजनी’चे पाणी सीना कोळेगाव धरणात आणण्यासाठी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत १२०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या पाण्यासाठी माजी आमदाराने काय केले? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बूस्ट; तानाजी सावंतांनी पक्षात आणली तरुणांची फळी

सीना कोळेगावात पाणी आणण्यासाठी नव्या लवादाची मान्यता हवी होती. तत्कालीन माजी आमदार फक्त कालवे खोदण्यात मग्न राहिले. मी प्रायोरिटी बदलली नसती तर ‘उजनी’चे आपल्या हक्काचे पाणी बारामतीला गेलं असतं. या भागाला सुजलाम सुफलाम बनविणारच असून आमदार नसतानाही शिवजलक्रांतीचे काम करून हा भाग समृद्ध केला. आता विरोधक खोटा नरेटीव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करत आहेत असे तानाजीराव सावंत म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशी तालुकाध्यक्ष सूर्यकांत सांडसे, शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर, युवासेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख अलका भालेकर, सुरेश कवडे, भाजपा तालुका अध्यक्ष राजगुरू, कुकडे, सुंदरराव उगडे, अमित कोळी, कुंडलीक आखाडे, पोपटराव सुरसे, शाखाप्रमुख बाबासाहेब हारे, भाजपाचे सीताराम कुलकर्णी, अशोक जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब काठवठे, राजू कोळी, समाधान मोटे, दीपक आखाडे, गणेश बोराडे, वाशी पंचायत समितीचे माजी सभापती बाईसाबाई पोनकुले यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साखर कारखाना, दूध संघ अन् पाणी.. तानाजी सावंतांनी भविष्यातील प्रोजेक्टच मांडला

follow us