Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत (Sambhajinagar) कार चालवणाऱ्या एका तरुणाने अक्षरशः थैमान घातलं. पदमपुरा ते समर्थनगर या परिसरात घडलेल्या या घटनेत एकूण सहा जणांना वाहनाने उडवलं गेलं असून, तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
संकेत शंकर अंभोरे असे आरोपी कारचालकाचे नाव असून तो मध्यधुंद अवस्थेत कार चालवत तो क्रांती चौकाकडून पदमपुरा भागाच्या दिशेने भरधाव वेगाने गेला. दरम्यान, अहिल्यादेवी होळकर चौकातून पंचवटी रोडवर पायी जाणाऱ्या अनसाबाई भागीरथ बरंडवाल आणि एका मुलीला या कारने जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातानंतर नागरिकांनी आणि काही तरुणांनी त्याच्या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.
राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची
तरीही संकेत अंभोरेने मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने कार वेगात पळवली आणि कार्तिकी सिग्नल परिसरात एका कारला धडक दिली. त्यानंतर चालकाने सावरकर चौकाच्या दिशेने कार वळवली आणि बंडू वैद्य चौकात एका दुचाकीस्वाराला धडक दिली. एवढ्यावरच न थांबता, समर्थनगर परिसरात एका स्कॉर्पिओ वाहनालाही त्याने धडक दिली. सलग अपघातांमुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली आणि लोकांनी संताप व्यक्त केला.
या अपघातांच्या मालिकेनंतर अखेर समर्थनगर परिसरात कार थांबल्यानंतर पाठलाग करणाऱ्या तरुणांनी संकेत अंभोरेला गाठले. त्यावेळी त्याने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले असल्याचे उघड झाले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याला क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणले.
या प्रकरणी प्रकाश कटारे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संकेत अंभोरेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरु असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अनेकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या तरुणाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.