तुळजापूर : सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्रोत्सवास येत्या 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आय. के. मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डायल 108 च्या एकूण 13 रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी आणि चालक यांसह कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक वैभव बाजारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. (Health system in Tuljapur on high alert for navratrotsav, 13 ambulances ready, security guards also trained in emergency)
बाजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाद्वार, विविध वाहनतळे, तसेच तुळजापूरकडे येणाऱ्या मार्गांवरती या रुग्णवाहिकांची ठिकाणे ठरविण्यात आली आहेत. तुळजापूरच्या दिशेने पायी चालत येणाऱ्या भाविकांची या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येतील तसेच अत्यावस्थ रुग्ण आढळल्यास त्वरित त्यास नजिकच्या आरोग्य सुविधा केंद्रात संदर्भित करण्यात येणार आहे. मागील वर्षी एकूण 14,532 रुग्णांना डायल 108 च्या रुग्णवाहिकेने सेवा पुरवली होती. त्यापैकी 303 अत्यावस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
जिल्हा व्यवस्थापक अमित माळवदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रा काळात उपलब्ध रुग्णवाहिकांची सेवा त्वरित उपलब्ध होण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपाचा आपत्कालीन प्रतिसाद कक्ष उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे तयार करण्यात आला असून, 24*7 ही सेवा उपलब्ध असणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांच्या मार्गदर्शनानुसार यात्रा काळात सुरक्षा यंत्रणा राबविण्यास आलेल्या बचाव पथक, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड,पुणे कंपनीच्या प्रशिक्षण विभागामार्फत वैद्यकीय आणीबाणी हाताळण्याचे प्रशिक्षण डॉ. सुनील कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आले.
यात्रा काळातील सर्व प्रकारची वैद्यकीय आणीबाणी हाताळण्यास डायल 108 रुग्णवाहिकेवरील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका चालक तसेच सर्व व्यवस्थापक 24*7 कार्यरत स्थानिक प्रशासनाबरोबर समन्वय ठेवून येणाऱ्या प्रत्येक सूचनेची त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांनी, भाविकांनी त्वरित वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी कोणत्याही लँडलाईन व मोबाईल वरून 108 क्रमांक डायल करावा असेही आवाहन वैभव बाजारे यांच्याकडून करण्यात आले