छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या 17 सप्टेंबरला संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात येत आहे. यावेळी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकही पार पडणार आहे. याच बैठकीत मराठवाड्याला तब्बल 40 हजार कोटींचे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यायल अशांसाठी निधीची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांमधून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मत पेरणी करण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न असणार आहे. (In a special meeting of the state cabinet, Marathwada is likely to get a package worth 40 thousand crores.)
येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्रामाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामुळे मराठवाड्यात सात वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अशात पुढील वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभांचा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत विविध लोकप्रिय निर्णय घेऊन मतपेरणी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. सध्या राज्याच्या इतर भागातील योजनांचे प्रस्ताव आणि आढावा बाजूला ठेवून केवळ मराठवाड्यातील जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.
या मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या अलिशान सुटमध्ये राहणार आहेत त्याचे भाडे 32 हजार रूपये असणार आहे. याशिवाय मंत्री, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांच्या दिमतीला 300 गाड्यांचा ताफा असणार आहे.
यापूर्वी देखील मराठावाड्यात मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण तर, सध्याच्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बैठकीदरम्यान सरकारी विश्रामगृह असलेल्या सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये राहण्यास पसंती दर्शवली होती. मात्र, यावेळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अलिशान तयारी करण्यात आल्याचे पहायला मिळत आहे.
औरंगाबादमध्ये पार पडणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शहरातील पंचतारांकीत हॉटेल रामा इंटरनॅश्नलमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांसाठी 30 रूम बुक करण्यात आल्या आहेत. याशिवाय दुसरे फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या ताज हॉटेलमध्ये सर्व सचिवांसाठी 40 रूम्स बुक करण्यात आल्या असून, उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकाऱ्यांसाठी अमरप्रीत हॉटेलमधील 70 तर, अजंता अॅम्बेसेडरमध्ये 40 रूम बुक करण्यात आल्या आहेत.