गड आला पण सिंह गेला! गोदाकाठचा वाघ बीडमध्ये, घराणेशाही संपली का? वाचा A टू Z कहाणी
नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल काल लागले. संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या बीड जिल्ह्यात काय झाल याची ही खास स्टोरी.
राज्यात काल नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणडणुकांचा निकाल लागला. यामध्ये अनेक ठिकाणी कुणाचे अंदाज चुकले तर गुणाचं गणित फसलं अशी स्थिती आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने मोठी विजायी आघाडी घेतली आहे. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींमध्ये युतीने 207 जागा जिंकल्या आहेत.
त्यामध्ये भाजप 117 जागा जिंकून आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 53 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 37 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडी 44 जागांपर्यंत मर्यादित राहिली. काँग्रेसने 28 जागा जिंकल्या, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 7 जागा जिंकल्या आणि शिवसेनेने (यूबीटी) 9 जागा जिंकल्या. इतरांनी 32 जागा जिंकल्या आहेत.
बीड नगर परिषदेवर गेली 40 वर्षापासून एकहाती सत्ता असलेल्या क्षीरसागर कुटुंबाला या निवडणुकीत चांगलाच हादरा बसला आहे. बीडच्या माजी खासदार दिवंगत केशरकाकु क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू भारतभुषण क्षीरसागर यांनी तब्बल 40 वर्ष नगर परिषदेवर आपलं एकहाती वर्चस्व राखलं होत. नगराध्यक्ष राहून भारतभुषण क्षीरसागर यांनी कायम नगरपरिषदेच्या सत्तास्थानी आपलं वर्चस्व दाखवून दिलं. परंतु, यावेळी पहिल्यांदाच क्षीरसागर घराण्यातून नगराध्यक्षपद दुसरीकंड गेलं आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे गेवराईचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचे सुत्र हाती घेतले होते. त्यांच्याकडं सुत्र आल्यानंतर मोठं नाराजीनाट्यही पाहायला मिळालं. हा नाराजीचा अंक बीड विधानसभा लढलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर यांनी पक्षांतर करण्यापर्यंत गेला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर हा अंक संपेल असं वाटलं असतानाच पंडित यांनी जास्त आक्रमक होत या निवडणुकीत लक्ष घातलं. अजित पवारांच्या तब्बल तीन सभा घेत स्वत: विजयसिंह पंडित बीडमध्ये तळ ठोकून होते. त्याचा परिणाम बीड नगर परिषदेत जसा दिसला तसा तो गेवराईतही दिसला.
‘गड आला पण सिंह गेला’ अशी परिस्थिती पंडित यांची झाली आहे. स्वत:ला गोदा काठचा वाघ म्हणणाऱ्या विजयसिंह पंडितांना बीडमध्ये विजय मिळवता आला पण आपल्या होमग्राऊंड गेवराईत मात्र पराभव स्वीकारावा लागला. बीडमध्ये भाजपला हरवलं अन् भाजपने गेवराईत यांना हरवलं असा हा निकाल. निकाल लागताच गुलालाने माखलेल्या विजयसिंह पंडित यांनी राजुरीचं पार्सल 35 वर्षांनी परत पाठवलं असं म्हणत क्षीरसागरांना डिवचलं अन् मला गोदा काठचा वाघ म्हणतेत अशी डरकाळी फोडली. त्यांची ही डरकाळी शहरात घुमली त्यावर क्षीरसागर घराण्याच्या नातसून आणि योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांनी लगेच प्रतिउत्तर दिलं.
बीड नगरपरिषद क्षीरसागरमुक्त झाली नाही. मी स्वत: क्षीरसागर म्हणून आणि आमचे 15 तर माझे दीर संदिप क्षीरसागर यांचे 14 नगरसेवक नगर परिषदेत असतील असं म्हणत, नगराध्यक्ष निवडून आल्यामुळे दंड थोपाटणाऱ्या पंडिताना ‘आम्ही मैदानात आहोत’ मैदान सोडलेलं नाही किंवा नसेल असाच सूचक इशारा सारिका यांनी दिला आहे. पण दुसरीकडं पंडित, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी क्षीरसागरांना दूर ठेवलं अशी चर्चा रंगली आहे. गेली अनेक काळ नगरपरिषदेत क्षीरसागर घराण्याचं वर्चस्व आहे ते मोडीत काढायचं आहे म्हणूनच त्यांच्याकडं दुर्लक्ष केल्याचं बोललं जातय. हे झालं बीडच.
राज्यभरातील नगरपरिषद अन् नगरपंचायतींचे निकाल हाती; वाचा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
गेवराईची निवडणुकही राज्यात गाजली. इथ भाजप राष्ट्रवादी अशी लढत सगळ्यांना दिसत असली तरी ती लढत तशी नव्हती किंवा तशी कधी होत नाही. इथ संघर्ष आहे तो पंडित आणि पवार घराण्याचा. भाजपचे गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार आणि पंडित घराण्यातील अमरसिंह, विजयसिंह यांच्यातून विस्वही जात नाही असा हा संघर्ष. या निवडणुकीत तर स्वत: बाळराजे यांच्या पत्नी गीता पवार याच मैदानात होत्या. त्यामुळे काहीतरी संघर्ष होईल अशी चर्चा असतानाच कडाक्याच भांडण ऐन मतदानाच्या दिवशीच झालं. बाळराजे यांच्या पत्नीबद्दल विजयसिंह पंडित यांचे पुतने अभयसिंह पंडित यांनी काहीतरी अपशब्द काढले असा आरोप झाला अन् वाद पेटला. हा वाद हाणामारीपर्यंत गेला. याच भांडणातून झालेल्या केसमध्ये बाळराजे सध्या अटक आहेत.
मतदानाच्या दिवशीच भांडण झाल्याने त्याचा परिणाम या निवडणुकीत झाला अन् पंडितांना पराभवाला सामोर जावं लागलं तर पवारांनी इथ बाजी मारली. बाळराजे पवार हे खुनाच्या गुन्ह्यात तब्बल 20 वर्ष अटक राहिलेले आहेत. त्यांचा थेट पंडित कुटुंबाशी संघर्ष असल्याने यांच्यात वारंवार वाद होतात अशी इथली स्थिती आहे. या निवडणुकीत विद्यमान आमदार विजयसिंह पंडित आणि बाळराजे पवार यांच्यात ही थेट लढत आहे असं चित्र इथ होत. अखेर त्याचं रुपांतर भांडण, अटक आणि पराभव असं झालं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर गाजलेल्या परळीत नक्की काय होतय याकडंही सगळ्यांच लक्ष लागलं होत. मागे बसलेल्या राजकीय फटक्यांचे आणि काळाचे पावलं ओळखून दोन्ही मुंडे बहीण भावाने युतीचा निर्णय घेतला अन् त्यांना त्यामध्ये यश आल्याचं चित्र आहे. लोकसभेचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याचं उघड बोलणारे धनंजय मुंडे एक लाख चाळीस हजार मताने विधानसभा जिंकले अन् मंत्री झाले. पण,देशमुख हत्या प्रकरणात त्यांचं वारंवार नाव समोर आलं, त्यांच्यावर आरोप झाले आणि अखेर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. जवळचा सहकारी वाल्मिक कराड अटक, लोकसभेचा पराभव अन् गेलेलं मंत्रिपद याची सल मना ठेऊन त्यांनी नगरपरिषदेची निवडणूक अटितटीची केली होती.
दारोदार फिरून धनंजय मुंडे प्रचार करत होते अन् कॉर्नर बैठका घेत होते. माझा सहकारी आपल्यात नाही असं म्हणून वाल्मिक कराडची आठवण काढून त्यांनी निवडणूक भावनीक टप्प्यावरही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पंरतु, येथे राजकीय बळी गेला अन् खच्चीकरण झालं ते पंकजा मुंडे यांचं. लोकसभेच्या पराभवानंतर त्यांनी कुठली निवडणूक लढवली नाही. पण भाजपची मुहुर्तमेढ गावोगावी रोवणाऱ्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या परळीतील कमळ चिन्हच गायब झाल्याच चित्र आहे. विधानसभेला युतीचे उमेदवार धनंजय मुंडे, त्यांचं चिन्हा घड्याळ. नगरपरिषदेला नगराध्यक्ष पादाच्या उमेदवार पद्मक्षी धर्माधिकारी, चिन्ह घड्याळ. त्यामुळं स्वत: पंकजा मुंडे यांना भाजपला मतदान करता आलेलं नाही इतकी नामुष्कीची वेळ त्यांच्यावर आली आहे. आणि हाही त्यांचा एक राजकीय पराभवच मानला जातोय.
तर एकंदरीत बीड जिल्ह्यात काय झालं? तर प्रस्थापितांना हादरे बसलेत…. मतदारांनी आणि राजकीय गणितांनी बीडमधून क्षीरसागर हटवले, गेवराईतून पंडित हटवले, माजलगावमधून सोळंके हटवले, अंबाजोगाईतून 30 वर्षापासून एकहाती सत्ता असलेले राजकिशोर उर्फ पापा मोदी हटवले आणि परळीतून भाजपच हटवले असा हा बीड जिल्ह्याचा निकाल आहे.
