वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती खेळी; भारताचा इंग्लंडवर 100 धावांनी विजय; सहाव्यांदा वर्ल्डकपवर कोरले नाव

आतापर्यंतच्या इतिहासात 10 वेळा अंडर १९ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला सहाव्यांदा त्यांनी वल्र्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (386)

India wins the Under-19 World Cup for the sixth time : हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भारताच्या अंडर-19 संघाने इतिहासाची पुनरावृत्ती करत क्रिकेटविश्वाला थक्क केलं आहे. आयसीसी पुरुष अंडर-19 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर तब्बल 100 धावांनी दणदणीत विजय मिळवत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला वैभव सूर्यवंशी. त्याच्या विक्रमी आणि वादळी 175 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 412 धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. या आव्हानासमोर इंग्लंडचा संघ पुरता गारद झाला आणि 312 धावांत सर्वबाद झाला.

भारताच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज यांनी केली. मात्र, सुरुवातीलाच भारताला धक्का बसला. आरोन जॉर्ज अवघ्या 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने डाव सावरत संयमी आणि जबाबदार खेळी केली. आयुषने 51 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली.

यानंतर मैदानावर वैभव सूर्यवंशीचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळाला. त्याने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि 55 चेंडूत शानदार शतक झळकावलं. पुढे फक्त 71 चेंडूत 150 धावांचा टप्पा ओलांडत त्याने प्रेक्षकांना थक्क केलं. अखेर 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने वैभवने 175 धावांची अफलातून खेळी साकारली. या डावात त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 218.75 इतका होता.

ब्रेकिंग : मुंबईत महापौर निवडीपूर्वी भाकरी फिरली; पवारांच्या एकमेव नगरसेवकाचा शिंदेंना पाठिंबा

वैभव बाद झाल्यानंतर भारताच्या डावाचा वेग काहीसा मंदावला, मात्र इतर फलंदाजांनीही मोलाचे योगदान दिले. विहान मल्होत्राने 36 चेंडूत 30 धावा केल्या, तर वेदांत त्रिवेदीने 32 धावांची उपयुक्त खेळी साकारली. अभिज्ञान कुंडूने आक्रमक खेळ करत 31 चेंडूत 40 धावा जोडल्या. आर. एस. अंबरीशने 18, खिलेन पटेलने 3, हिनेल पटेलने 5 धावा केल्या, तर कनिष्क चौहान 37 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून जेम्स मिंटोने 3 विकेट घेतल्या, तर एलेक्स ग्रीन आणि सेबस्टियन मॉर्गन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

412 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले आणि संपूर्ण संघ 312 धावांत गारद झाला.

या विजयासह भारताने 2000, 2008, 2012, 2018, 2022 आणि आता 2026 मध्ये सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक उंचावत क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.

follow us