Download App

..तर विधानसभेला 288 उमेदवार देणार; उपोषण सुरू करताच जरांगेंचा सरकारला इशारा

जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे केल्याशिवाय राहणार नाही.

Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या निवडणुकीत आम्ही नाव घेऊन उमेदवार पाडणार, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. उपोषणस्थळी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला हा इशारा दिला.

मनोज जरांगे यांनी याआधी 4 जूनला उपोषण सुरू करणार असल्याचे म्हटले होते. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा विचार करून उपोषणासाठी 8 जून तारीख निश्चित करण्यात आली. या उपोषणाला स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेली नाही तरी देखील जरांगेंनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला परवानगी प्रशासनाने नाही तर सरकारनेच नाकारल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मनोज जरांगेंची मोठी घोषणा; 288 मतदारसंघात देणार उमेदवार, राजकीय पक्षांना घाम फोडणार

मराठा समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, माझं सर्व समाजाला आवाहन आहे की आपण शांततेत राहायचं आहे. आमच्या आंदोलनाविरुद्ध जाणीवपूर्वक निवेदन देण्यात आलं. आम्हीही अशा पद्धतीचं निवेदन देऊ शकतो. भविष्यात तुमच्याही रॅली निघतील. त्यावेळी महाराशष्ट्रात रॅली काढली तर आम्हाला रहदारीचा त्रास होईल मग तुमची रॅली रद्द करणार का, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

तुमच्यावर पु्न्हा उपोषणाची वेळ का आली असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी इतकीच आमची मागणी आहे. या मागणीसाठीच मी पुन्हा उपोषणाला बसलो आहे. सरकारला जर आणखी काही पुराव्यांची गरज असेल तर आधीच 57 लाख नोंदी सापडल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

मराठे जातीयवादी असते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले असते का? मनोज जरांगे

उद्या नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मी सुद्धा त्यांना निवेदन पाठवणार आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. आता गावागावात आंदोलन करू नका. शेतीची कामं सोडून आंदोलन स्थळी येऊ नका असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. दरम्यान, आंदोलन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

follow us