Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानं राज्यातील परिस्थिती चिघळलेली आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. विरोधक आणि मराठा समाज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) या लाठीचार्ज प्रकरणी जबाबदार धरत आहे. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होऊ लागली. दरम्यान, आज फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही टीका केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली गावात आंदोलन सुरू असतांना शुक्रवारी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेटी दिल्या. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, काही पक्ष, राजकीय नेते या घटनेचे राजकारण करत आहेत. विशेषत: लाठीचार्ज करण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले, असं नॅरेटीव्ह तयार केलं. सगळ्या नेत्यांना हे माहित आहे की, लाठीचार्जचे निर्णय घेण्याचा अधिकार एसपी आणि डीवायएसपी यांच्या पातळीवर असतो. त्यालासाठी त्यांना कुणाला विचारावं लागत नाही.
मग सवाल असा आहे की, पोलिसांच्या हल्ल्यात 113 निष्पाप गोवारी मारल्या गेले तेव्हा त्याचा आदेश कोणी दिला? तो आदेश मंत्रालयातून आला होता का? मावळमध्ये झालेल्या गोळीबारात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली, त्यावेळी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गोळीबाराचे आदेश दिले होते का? असा सवाल त्यांनी केला.
राखी बांधल्यावर ओवाळणीत 21 हजार देण्यास विरोध : तीन बहिणींची भावाच्या बायकोला जबर मारहाण
ते म्हणाले, 2018 मध्ये आरक्षणाचा कायदा केला. त्यानंतर उच्च न्यायालयाने तो कायदाही मान्य केला. त्यानंतर हे प्रकरण वारंवार सर्वोच्च न्यायालयातही गेलं. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर सरकार बदललं. आणि त्यानंर 2020 मध्ये या कायद्याला स्थगिती देण्यात आली आणि 5 मे 2021 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे जालन्याला गेले होते त्यावेळी ते म्हणाले की, याच्यावर लगेच वटहुकूम काढा. उद्धवजी, तुम्ही 5 मे 2021 पासून एक वर्ष आणि एक महिना मुख्यमंत्री होतात, तर मग यावर तुम्ही वटहुकूम का काढला नाही? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, हा सगळा उद्योग फक्त राजकारण करण्यासाठी आहे. जालन्याची घटना चुकीची आहे पण सरकार हे करतंय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे राजकारण सुरू आहे हे जनतेलाही माहीत आहे, असं फडणवीस म्हणाले.