Jalna News : राज्यात चर्चिल्या गेलेल्या जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात (Jalna News) मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा अंबड पोलिसां गुन्हा दाखल झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एकूण 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. या नुकसानीचे पंचनामे करून त्यांची भरपाई म्हणून सरकारने अनुदान दिले होते. या सरकारी मदतीतून थोडा का होईना दिलासा मिळणार होता. मात्र याच अनुदानावर डल्ला मारण्यात आला. विशेष म्हणजे, यात महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, संगणक ऑपरेटर आणि नेटवर्क इंजिनिअर सहभागी होते. त्यामुळे कुंपणानेच शेत खाल्लं अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटली होती.
सन 2022-23 या काळात जालन्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली होती. या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर केले होते. परंतु, या अनुदानाचे वाटप करताना अनेक गैरप्रकार झाले होते. शेती नसलेल्या व्यक्तीच्या नावावर अनुदान टाकून तब्बल 72 कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा, 11 कर्मचारी निलंबित; जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची कारवाई
एकाच शेतकऱ्याला दुबार अनुदान वाटप, शेतकरी नाही तरीही परगावातील आणि परजिल्ह्यातील लोकांच्या खात्यात अनुदान वळवण्यात आले होते. सातबारावरील नोंदीपेक्षा जास्त क्षेत्रवाढ दाखवणे, शासकीय जमिनी दाखवून अनुदानाचा लाभ देणे, जिरायत ऐवजी बागायत शेती दाखवणे, संबंधित खात्यात जमा झालेली रक्कम परत घेणे अशा विविध पद्धतीने फसवणूक झाली होती.
तीन वर्षांच्या काळात 1533 कोटी 72 लाख 68 हजार 950 रुपये मिळाले होते. त्यापैकी 12 लाख 35 हजार 244 शेतकऱ्यांना 1308 कोटी 55 लाख 37 हजार 880 रुपये अदा करण्यात आले होते. उर्वरित अनुदानाचे वाटप अजूनही सुरुच आहे. परंतु, अनुदान वाटप करताना पोर्टलवर बोगस नावे टाकून अनुदान लाटण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत अंबड आणि घनसावंगी तालुक्यात 42 कोटी 50 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.
स्वातंत्र्यादिनी जालना पोलिसांचा माजोरडेपणा महाराष्ट्रासमोर; आंदोलनकर्त्याच्या कंबरात घातली लाथ