जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात आक्रोश वाढला आहे. यातच जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा भाजपा (BJP) ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. आव्हाडांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सातत्याने वादग्रस्त विधानं आणि ट्विट करीत आहेत. त्यांच्या वक्तव्यांवर भाजपकडून देखील जोरदार हल्ला केला जातोय. नुकतेच आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर आता राज्यात संताप व्यक्त होतं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आज एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणातात, रामायणातून रावण काढून श्रीराम समजावून सांगा. महाभारतातून दुर्योधन, कर्ण काढून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघलशाही काढून शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा असं ट्विट त्यांनी केलं आहे.
आव्हाडांच्या याच ट्विटनंतर भाजपकडून आव्हाडांवर जोरदार शाब्दिक हल्ला केला जातो आहे. जालना भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी सांगितलं की, जितेंद्र आव्हाड ज्या ठिकाणी दिसतील तिथे त्यांची जीभ जो छाटेल त्याला भाजपतर्फे 10 लाख रुपयांचं बक्षिस देण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, हे पक्षाचं राजकारण नाही, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी बोलत नसतो. आम्ही नॉन पॉलिटकल प्लॅटफॉर्मवर जाऊन बहुजनांचा इतिहास सांगत असतो. आवाज बहुजनांचा आहे ना हे नेमकं भाजपचं दुखणं आहे, अशी टीका त्यांनी केली.