मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह (Beed) प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे तसेच एटीएम व ऑनलाइन बँकिंगचा गैरवापर करून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नेकनूर पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. 9 जुलै 2026 रोजी नेकनूर पोलिस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
बीडमध्ये धक्कादायक प्रकार उघड; महिलेचा 22 वर्षांपूर्वी मृत्यू, पण पेन्शन सुरू
फिर्यादी श्रीपाद कृष्णाजी कुलकर्णी (रा. भूम) हे आपल्या कुटुंबासह चारचाकी वाहनातून जात असताना मांजरसुंबा घाट परिसरात आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून वाहन आडवे लावत त्यांना जबरदस्तीने थांबविले. त्यानंतर आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि सोन्याची अंगठी, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू लुटल्या.
एवढ्यावरच न थांबता फिर्यादीचे एटीएम कार्ड ताब्यात घेऊन त्याचा पासवर्ड मिळविण्यात आला. त्यानंतर खात्यातून रोख रक्कम काढण्यात आली. मोबाईलवरील ऑनलाइन बँकिंग सुविधेचाही गैरवापर करून विविध व्यवहारांद्वारे रक्कम हस्तांतरित करण्यात आली.आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना इच्छेविरुद्ध विविध ठिकाणी नेऊन बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याचेही तपासात समोर आले असल्याचे मंगेश साळवे यांनी सांगितले.
