Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी परभणी येथे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात मंत्री धनंजय मुंडेंबाबत मोठं विधान केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ मुंडे समर्थकांनी आज परळीतील पोलिस ठाण्यात (Parli Police Station) ठिय्या मांडून जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जरांगेंवर रविवारी सायंकाळी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे, अशा आरोपांखाली जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा आणि देशमुख कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी काल परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मूक मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर घरात घुसून मारु, असा इशारा जरागेंनी दिला होता. जरांगेंच्या या वक्तव्यानंतर मुंडे यांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मुंडे यांच्या समर्थकांनी आज बीड आणि परळी पोलीस ठाण्यांसमोर निदर्शने करत जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच अंजली दमानिया, सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची घोषणा करण्यात आल्या.
धस अन् जरांगे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक, पावशेर दारू पिऊन..; गुणरत्न सदावर्तेंचे टीकास्त्र
दरम्यान, तुकाराम आघाव यांनी याबाबत फिर्यादही दिला होती. त्यानंतर जरांगे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे यांच्या विरोधात अपशब्द वापरणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदावर्ते काय म्हणाले?
गुणरत्न सदावर्ते यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मनोज जरांगे तुझी उंची किती आहे, तुझं शिक्षण काय? तू बोलतो काय? पावशेर दारू पिऊन जर कुणी मंत्री धनंजय मुंडेंना अपमानित करण्याच धाडस करत असेल तर तो कितीही मोठा असो, त्याची गय केली जाणार नाही, त्याला संविधानिक उत्तर दिलं जाईल, तुमच्याचा बापाचे रस्ते आहेत का बे? शेताला शेत असलं तरी वाट द्यावी लागलेत, असं सदावर्ते म्हणाले. सुरेश धस, जरांगे पाटील हे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत. मृत व्यक्तीच्या नावावर राजकारण करून मंत्रीपद न मिळाल्याने ते आरोप करत आहेत. मंत्रिपदाची लालसेपोटी ते मोर्चांमध्ये सहभागी ते होत आहे, अशी टीका सदावर्तेंनी केली.