Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याविरोधात (Jarange) षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप करत, या प्रकरणात नेमके कोण लोक सहभागी आहेत आणि त्यांचा एकनाथ शिंदे यांच्याशी काही संबंध आहे का, याचं उत्तर शिंदे यांनी द्यावं, असं म्हटलं आहे. रामदास कदम यांच्याकडून ही ऑडिओ क्लिप आपल्याकडे येण्यापूर्वीच व्हायरल करण्यात आली होती, असा दावाही जरांगे यांनी केला.
रामदास कदम यांनी ही क्लिप का प्रसारित केली आणि त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर 500 कोटी रुपये पोहोचल्याचा उल्लेख असलेला भागच का प्रसारित करण्यात आला, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच, रामदास कदम यांच्या मुलाला गृह राज्यमंत्री करण्यामागे नेमका काय हेतू होता, याबाबतही जरांगे यांनी सवाल उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांचा लढा अधिक मजबूत करण्यासाठी मराठा सेवकांची नव्याने फळी उभी करण्याची गरज व्यक्त केली आहे. मराठा सेवक म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांसाठी व्हॉट्सॲप नंबर देण्यात येणार असून, त्यांना थेट संपर्कात ठेवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. समाजासाठी काम करताना दगाफटका होऊ नये आणि समाजाशी गद्दारी होऊ नये, यासाठी एकजुटीने काम करण्यावर त्यांनी भर दिला. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर भूमिका घ्यावी, असं म्हणतानाच भविष्यात आंदोलनाच्या मैदानात उतरण्याची वेळ येऊ शकते, असे संकेतही जरांगे पाटील यांनी दिले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडद्यामागे डावपेच आखले जात असल्याचा आरोप करत, मराठा समाजाला आरक्षण मागितल्यामुळे लक्ष्य केलं जात असल्याची भावना व्यक्त केली. पुढे गोड बोलायचं आणि मागून डाव खेळायचे, हे आता समाजाच्या लक्षात आलं आहे. पडद्यामागे काय नियोजन केलं जातं, कोण कुणाच्या बाजूने आहे आणि कोण मॅनेज झालं आहे, याचा मेळ लागत नसल्याचं सांगत, मराठा समाजाला संकटात टाकण्यामागे नेमकं काय चाललं आहे, हे समोर आलं पाहिजे, असंही जरांगे म्हणाले.
या परिस्थितीत मराठा समाजाची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी राज्यभर मराठा सेवकांची भक्कम फळी उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून पुढील 2 ते 3 दिवसांत या कामाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक विभागात मराठा सेवकांची संघटना तयार करून त्यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्कात ठेवलं जाणार आहे. ही फळी मजबूत झाली, तर समाजाच्या आंदोलनाला नवी ताकद मिळेल आणि मराठा समाजाला रोखणं कोणालाही शक्य होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील राजकीय पक्षांचीही गरजवंत मराठ्यांप्रती जबाबदारी असून, त्यांच्या अडचणी वाढवण्याऐवजी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असं जरांगे म्हणाले. या रेकॉर्डिंगमधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असून, भविष्यात कोणतीही भूमिका घेताना समाजाशी दगाफटका होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी कट्टर आणि कडवट कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल, कारण समाजाची एकजूट आणि मजबूत संघटन असेल, तर मराठा समाजाला हरवण्याची हिंमत कोणी करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
