Manoj Jarange on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने (Manoj Jarange Patil) प्रयत्न करत आहेत. जानेवारी महिन्यातही त्यांनी पुन्हा सहा दिवसांचे आंदोलन केले होते. यानंतर आता जरांगे पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. दोन मंत्र्यांना सोबत घेत राज्य सरकार नवे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे असा दावा जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धाराशिव येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्य सरकारकडून दोन मंत्र्यांना सोबत घेत नवीन आंदोलन उभारण्याची तयारी केली जात आहे. या दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर चर्चा देखील केली आहे. आम्ही म्हणू तके ऐका अन्यथा, षडयंत्र रचून बदनाम करू अशी सरकारची भूमिका आहे. आता मराठा समाजाच्या आंदोलनासमोर प्रति आंदोलन उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या आंदोलनात दोन मंत्री आहेत. 12 ते 13 दिवस उपोषण करणार. नंतर सरकार लगेच बैठक लावणार. या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस यांचीही साथ आहे. हे त्यातल्याच एका मंत्र्याने मला सांगितले असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
मनोजदादांना गैरसमज, त्यांना भेटतो अन्.. जरांगे पाटलांच्या आरोपांवर धसांचं स्पष्टीकरण
यानंतर जरांगे पाटील यांनी पुढील वाटचाल कशी राहील याबाबत माहिती दिली. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपण जर एक आलो तर राहिलेलं आरक्षणही मिळेल असे जरांगे म्हणाले होते. नुसती गर्दी करून किंवा मोठ्या सभा घेऊन आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावातील लोकांना त्यांच्या अडचणी सांगण्यासाठी त्यांना हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. तसेच प्रत्येक गावात एक सेवक देणार आहोत. गावातील नागरिक या सेवकाला अडचणी सांगतील असे जरांगे पाटील म्हणाले.