दर वर्षी बदलत्या हवामानाचा मराठवाड्याला (Marathwada) मोठा फटका बसत असून अनियमित पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे शेतीसमोरील संकट अधिक गंभीर होत आहे. या बदलांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी मराठवाड्यातच अद्ययावत हवामान अभ्यास व संशोधन केंद्र उभारण्याची गरज आहे, असे पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी सांगितले. मोहा ता परळी येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार आणि महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या 18 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.
हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा थेट परिणाम जाणवत आहे, असे देऊळगावकर यांनी स्पष्ट केले. भांडवलीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे कार्बन तसेच विषारी वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर जंगलांचा होत असलेला ऱ्हास आणि कंपन्याधार्जिणी धोरणे यामुळे हवामान बदलाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. शेतीचे अर्थकारण आधीच अडचणीत असताना हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुष्काळाच्या सावटाखालील धरणांची पातळी खालावली, उजनी-जायकवाडीतून दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन
शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकारने थेट मदत देण्याची गरज असल्याचे देऊळगावकर यांनी सांगितले. डॉ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार उत्पादन खर्च आणि त्यावर 50 टक्के नफा या सूत्रानुसार शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मराठवाड्यात हवामान अभ्यास व संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे. मात्र सरकारकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असून धोरणकर्त्यांच्या उदासीनतेचा फटका मराठवाड्याला सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
या कार्यक्रमाला कॉ पी एस घाडगे, संस्थेचे सचिव कॉ ॲड अजय बुरांडे, समाज प्रबोधन ॲकॅडमीचे कॉ सुधाकर शिंदे, संजय मोरे, ज्येष्ठ संचालक प्रा धुळे, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ सुदाम शिंदे, कॉ संदीपान तेलगड आणि कॉ सखाराम शिंदे उपस्थित होते. कॉ ॲड अजय बुरांडे यांनी प्रास्ताविक केले तर कॉ पी एस घाडगे यांनी समारोप केला. मराठवाड्यातील हवामान बदलाचे वाढते परिणाम लक्षात घेता या भागात स्वतंत्र हवामान अभ्यास केंद्र उभारण्याची मागणी या व्याख्यानातून पुन्हा अधोरेखित झाली.
