Market Committee Election Kada : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तैयारी करत आहे. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवत आहेत. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणत आहेत. नगर जिल्ह्यातील जामखेड येथे भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाजपात आणून राष्ट्रवादी काँगेसला मोठा धक्का दिला. परंतु जामखेड शेजारील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील कडा येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवणूक बिनविरोध केली आहे.
या बिनविरोध निवडणुकीचे श्रेय तेथील भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस आणि तेथील राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार बाळासाहेब आजबे यांना जाते. दोन विरोधकांनी एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध केली आहे. 18 जागांपैकी 12 जागा आपल्याकडे घेत सुरेश धस यांनी आपेले वर्चस्व येथे दाखून दिले आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार बाळासाहेब आजबे यांना मात्र 3 जागांवर समाधान मानावे लागले. तर माजी आमदार भीमराव धोंडे गटाला 3 जागा देण्यात आल्या आहेत. तशी घोषणा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली.
धस म्हणाले की, या संचालक मंडळाच्या माध्यमातून सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मतदार संघात सर्व समाज घटकांना समान न्याय या माध्यमातून आम्ही दिलेला आहे. कडा मार्केट कमिटीच्या माध्यमातून आजवर आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा व योग्य निर्णय घेत, शेतकरी व व्यापारी यांच्यातील दुवा जोडत, या मार्केटची भरभराटी करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांशी विचारविनिमय करून ही बाजार समितीची निवडणूक आम्ही बिनविरोध केली. बाजार समित्यांना निवडणुकीचा खर्च परवडत नाही. तसेच, विनाकारण मतभेद वाढावायचे नको; म्हणून ही निवडणूक बिनविरोध केलेली आहे.
राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का; बाजार समितीच्या रणधुमाळीत तालुकाध्यक्षच फोडला !
बाजार समितीच्या 18 जागांसाठी 58 अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यातच आमदार धस यांनी पुढाकार घेत सर्वांशी चर्चा केली. त्यात बाजार समिती बिनविरोध करण्यावर राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे, आमदार धस, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर यांच्यामध्ये एकमत झाले आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळींमध्ये एकमत झाल्यानंतर अर्ज भरलेल्या इतरांनाही विनंती करण्यात आली, त्यामुळे बाजार समितीच्या 18 जागांसाठी अठराच अर्ज शिल्लक राहिल्याने ही बाजार समिती बिनविरोध झाली.