Download App

MLA Santosh Bangar assaulted principal: आमदार संतोष बांगर यांची गुंडगिरी, प्राचार्यांना मारहाण

हिंगोली: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची दादागिरी सुरुच आहे. हिंगोलीतील (Hingoli) एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

ठेकेदाराचे कॅन्टीन बिल पास न केल्याच्या रागातून ही मारहाण केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (Government Technical College) प्राचार्य अशोक उपाध्याय यांना मारहाण केल्याच दिसत आहे.

हा व्हिडिओ 3-4 दिवसांपूर्वीच्या घटनेचा असल्याची माहिती आहे. संतोष बांगर यांनी प्राचार्यांचा कानच पकडला आहे. केवळ आमदार संतोष बांगरच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा प्राचार्यांचा कान पकडत त्यांना मारहाण केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका होत आहे.

संतोष बांगर यांच्याकडून वारंवार कायदा हातात घेतला जात आहे. यापूर्वी त्यांनी पोलिस कर्मचारी तसेच काही अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व मारहाण केल्याचे समोर आले होते.

यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आपले मंत्री, आमदारांना आवर घाला, अशी सूचना केली होती. त्यानंतरही अशा घटना समोर येत आहे.

संतोष बांगर यांनी मंत्रालयातील पोलिस शिपायालाही धमकी दिली होती. ‘माझ्याकडे पिस्तूल असते, तर तुम्हाला गोळ्या घातल्या असत्या,’ अशी धमकी दिली होती. याबाबत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने मंत्रालय पोलिस नियंत्रण कक्षाच्या दैनंदिन डायरीमध्ये याबाबत नोंद केली होती. या नोंदीचे पडसाद मंत्रालयात उमटले होते.

मंत्रालयातील घटनेपूर्वी आरोग्य कर्मचारी व पीक विम्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही बांगर यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याचे समोर आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर यांची वर्षा निवासस्थानी जोरदार कानउघडणी केली, अशी माहिती होती. मात्र, तरीही आमदार संतोष बांगर यांच्या कडून अशा घटना घडत आहेत.

Tags

follow us