धनंजय मुंडे, बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा चेहरा. पण तेच अजित पवार यांच्या गटात गेल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यापाठोपाठ माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे हेही अजितदादांच्याच व्यासपीठावर जाऊन दाखल झाले. कधीकाळी फक्त ‘शरद पवार’ या नावाभोवती फिरणारा जिल्हा अचानकपणे अजित पवार यांच्या नावाभोवती फिरु लागला. यामुळे शरद पवार यांचे वलय कमी होते की काय अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरु झाली. (NCP Chief Sharad Pawar rally in Beed, All old leaders and MLA Form NCP was seen on stage)
मात्र शरद पवार यांच्या आजच्या सभेत या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाल्याच दिसून आले. विद्यमान तीन आमदार जरी अजित पवारांसोबत गेले असले तरीही जुनी फळी मात्र अजूनही शरद पवार यांच्यासोबतच असल्याचं दिसून आले. आज पवारांच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, आष्टी मतदारसंघातील माजी आमदार साहेबराव दरेकर, माजलगावचे माजी आमदार, राधाकृष्ण हुके पाटील, केजचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या माजी आमदार उषाताई दराडे अशी माजी आमदारांची गर्दीच गर्दी पाहायला मिळाली.
याशिवाय तरुण पिढीतून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेही शरद पवारांच्याच बाजूने उभे राहिले आहेत. याशिवाय तरुण नेते बबन गिते यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार यांना बीडमधून राष्ट्रवादीच्या जुन्या पिढीसोबत नवी फळीचीही साथ मिळाली असल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्हा हा सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्यासोबत चालणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अगदी समाजवादी काँग्रेसच्या काळातही जिल्ह्यातील सातही आमदार विजयी झाले होते. त्यानंतर 1984 च्या निवडणुकीपूर्वी अनेक जण पवारांची साथ सोडून पुन्हा काँग्रेसकडे परतले. यात सुंदरराव सोळंके यांच्यासारख्या बड्या नेत्यानेही साथ सोडली होती. मात्र पवारांनी हार न मानता नव्या चेहऱ्यांना संधी देत सर्वांना निवडून आणले आणि बीड हा आपलाच गड असल्याचे दाखवून दिले.
पुढे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही जिल्हा पवारांसोबत होता. अनेक मातब्बर घराणी राष्ट्रवादीसोबत आली. यातून विमल मुंदडा, सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर असे नेतेमंडळी आमदार झाले. पुढे यांनीही पवारांची साथ सोडून सत्तेची कास धरली. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील 6 पैकी 4 आमदार पवारांनी निवडून आणले. यात जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करत त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून त्यांच्या पुतण्याला निवडून आणले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्यातील हक्काचा बालेकिल्ला म्हणून बीडकडे पाहिले जाते.