जालना : शिंदे गटात प्रवेश केल्यानं शिंदे गटातील काही जणांना चरबी चढली आहे. खोतकर आणि झोल कुटुंबियांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील उद्योजक किरण खरात यांची सुपारी दिली आहे. खोतकर यांची जालन्याचा बिहार करायची तयारी आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर मोक्का लावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंटयाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
क्रिप्टो करन्सी आणि आर्थिक देवाण घेवाणीतून जालन्यातील मंगरूळ येथील किरण खरात यांना मारहाण करण्यात आली असून गजानन तौर यांच्यासह आणखी काही गुंडानी त्यांचं अपहरण करून टॉर्चर केलंय. त्यामुळे पोलिसांनी विजय झोल यांच्यासह अपहरण करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी अशी मागणीही गोरंटयाल यांनी केली.
दोन दिवसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण भेटणार असून अर्जुन खोतकर हा तुमच्या नावाने जालन्यात नांगनाच करून लोकांना त्रास देत असल्याची तक्रार करणार असल्याचं गोरंटयाल यांनी म्हटलंय. अर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाला असून व्यवहारात फायदा झाला की, मजा करायची आणि तोटा झाला की लोकांना मारायचं असं योग्य नाही असं गोरंटयाल म्हणाले आहे.
किरण खरात याचं दोन वेळा अपहरण करण्यात आलं असून पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचे दोन गुन्हे दाखल करावे अशी मागणीही गोरंटयाल यांनी केली. आरोपींनी किरण खरात याच्या घरी जाऊन केलेल्या टॉर्चरचे व्हिडीओ देखील गोरंटयाल यांनी पत्रकारांना दिले.