संभाजीनगर : वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप प्रकरणामुळे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले. दरम्यान याच मुद्द्यावरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण सभागृहात मांडलं आणि सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता याप्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सत्तारांवर हल्लाबोल केला आहे.
अब्दुल सत्तार यांच्या बाबत फक्त वाशिम येथील प्रकरण समोर आले. मात्र इतर ठिकाणी देखील अनेक मुद्दे आहेत. वाळू लिलाव असेल किंवा एका अधिकाऱ्याला धमकावत न्यायालयाच्या विरोधात काम केले जात आहे. त्याचे पुरावे नंतर सादर करेल असा आरोप विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.
पुढे बोलताना दानवे म्हणाले, अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. प्रश्न मांडण्यासाठी अवधी जास्त हवा. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ व्यासपीठ आहे. जेवढं शक्य होईल तितके प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी आहे त्यामुळे पूर्णपणे समाधानी नाही. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांवर टीका करताना दानवे म्हणाले, जमिनीबाबत न्यायालयाने ताशेरे ओढल्यावर मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती अस म्हणत त्यावर आम्ही कागदपत्र सादर केले. न्यायालय निश्चित आगामी काळात योग्य निर्णय करेल, असे दानवे म्हणाले.
सरकारने विरोधकांचे अनेक प्रश्नांची दखल घेतली. त्यांनी काही मान्य केले. आम्ही विरोधक आहोत शत्रू नाही. शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही आंदोलन केले. सभागृह बाहेर आणि आत आम्ही आमच्या भूमिका मांडल्या. अडकलेले मंत्री सुटणार नाही. जनतेच्या न्यायालयात कोणीही सुटणार नाही. सुप्रीम कोर्टात सरकार विरोधात निकाल लागेल असा विश्वास यावेळी दानवे यांनी व्यक्त केला.