SFI Membership Registration Campaign : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासोबतच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या प्रगत विद्यार्थी संघटनेच्या सभासद नोंदणी मोहिमेला शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये आजपासून जोरदार सुरुवात झाली आहे. सोमवार (दि. ४ ऑगस्ट २०२५)रोजी न्यू भगतसिंग माध्यमिक विद्यालय, रांजणगाव, गंगापूर येथे या मोहिमेला उत्साही प्रतिसाद मिळाला.
६ वी पासून पुढच्या वर्गांमध्ये सभासद नोंदणी करण्यात आली. या मोहिमेत शाळेतील ५४९ मुलामुलींनी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. एसएफआयच्या स्थानिक नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत कार्यकर्ते , शाळा ,महाविद्यालयीन कॅम्पस, वसतिगृहे, ग्रंथालये, रिडींग रुम, अशा विविध ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना संघटनेच्या कार्याचा, उद्दिष्टांचा आणि इतिहासाचा सविस्तर परिचय करून देतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक प्रश्नांसह, त्यांच्यापुढील सामाजिक व आर्थिक अडचणींच्या संदर्भात एसएफआय नेहमीच भक्कमपणे उभी राहत आली आहे.
लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष
सभासद नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, एसएफआय ही केवळ संघटना नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणाच्या सर्वसामान्य हक्कासाठी लढणारे आंदोलन आहे. सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगाराची संविधानिक हमी द्या अशी मागणी करणारी एसएफआय ही देशातील एकमेव विद्यार्थी संघटना आहे. सार्वजनिक शिक्षण संरक्षण, शिक्षणखात्यातील खासगीकरणाला विरोध, परीक्षा प्रणालीतील सुधारणा, शिष्यवृत्तीविषयक अडचणी सोडवणे, मुलींविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे इत्यादी अनेक प्रश्नांवर एसएफआयने नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी संघटनेची माहिती मिळाल्यानंतर स्वयंप्रेरणेने नोंदणीसाठी पुढे येत, संघटनेसोबत सक्रियपणे काम करण्याची तयारी दर्शवली. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांनी छोट्या गट चर्चा केल्या व प्रश्नोत्तर सत्र आयोजित करून एसएफआयच्या कार्यपद्धतीबाबत अधिक त्यांनी दिली गेली. एसएफआय पुढील काही आठवडे सभासद नोंदणी मोहीम चालणार असून, या दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम, चर्चा सत्रे, वाचनगोष्टी, सांस्कृतिक उपक्रम , खेळ, स्पर्धा, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेच्या विचारसरणीचा विस्तार करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्हान
विशेषत ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या नेत्यांनी दिली. एसएफआयच्या या सभासद नोंदणी मोहिमेमुळे विद्यार्थी प्रश्नांसाठी एकजूट होण्याची आणि जागरूक विद्यार्थी चळवळीला बळकटी देण्याची दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी एसएफआय जिल्हा सचिव कॉम्रेड अरुण मते, एसएफआय विद्यापीठ अध्यक्ष सुरज देवकर व कार्यकर्ते उपस्थित होते.