स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि कथित (MPSC) गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांचा संताप आता राज्यभर उफाळून येत आहे. पुणे आणि कोल्हापूरनंतर मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांनी मोठा आक्रोश मोर्चा काढला. क्रांती चौकात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्र येत त्यांनी आयोगाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासह दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातात विविध फलक घेऊन MPSCच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘आम्ही रात्रंदिवस झिझायचं, तुम्ही पेपर फोडून विकायचं’, ‘MPSC मेहनत? की पैशांचा खेळ?’ अशा घोषवाक्यांमधून विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला. MPSCच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
MPSC Paper Leak : पुरावे द्या, राजीनामा देतो MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार क्लिअर बोलले
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही MPSC विद्यार्थ्यांची एकजूट दिसून येत असून त्यांच्या मागण्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले. MPSCचे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावे, तसेच पेपरफुटी प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या या आक्रोशाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही तर परिस्थिती आणखी तीव्र होऊ शकते, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. आज विद्यार्थ्यांच्या मनात असलेला आक्रोश उद्या रोषात बदलू शकतो आणि ही परिस्थिती सरकारला परवडणारी नसेल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, पेपरफुटी प्रकरणाचा तपास आणि दोषींवरील कारवाईबाबत सरकार आता काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
