Sudden recognition blood sandalwood inherited from his father farmer become millionaire : यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याला एका झाडानं रात्रीतून करोडपती केलंय. ही बाब सहजासहजी तुमच्या पचनी पडणार नाही. मात्र, हेच सत्य आहे. केशव शिंदे असं या पुसद तालुक्यातल्या खुर्शी इथल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ते रक्तचंदनाच्या एका झाडामुळे करोडपती झाले आहेत. त्यांच्या जमिनीवर असलेल्या 100 वर्षे जुन्या डेरेदार रक्त चंदनाच्या झाडासाठी अंतरिम भरपाई म्हणून 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
तर त्याचं झालं असं की, केशव शिंदे यांचं 7 एकर वडिलोपार्जित शेत आहे. त्या शेतात एक झाड आहे. हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला माहीतीही नव्हते? मात्र, 2013-14 मध्ये रेल्वेचा एक सर्व्हे झाला. त्यात त्याचं शेत नांदेड सेवाग्राम रेल्वे मार्गासाठी अधिग्रहीत करण्यात आलं. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आणि सर्वे करण्यासाठी आले होते. त्यांनीच हे झाड रक्तचंदनाचे असून त्याचं मूल्य शिंदेंना समजावून सांगितलं होतं.
13 एप्रिल रोजी आकाशात दिसणार ‘गुलाबी चंद्र’; जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येणार?
आपल्या शेतात रक्तचंदनाचं झाड असल्याचं समजल्यानंतर शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला. दरम्यन, मधल्या काळात रेल्वे प्रशासनानं भूसंपादन केले. मात्र, या झाडाचं मूल्य देण्यास रेल्वे प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू झाली. त्यामुळं या परिवाराने या झाडाचे खाजगीमधून मूल्यांकन काढलं. त्यावेळेस त्याचे मूल्यांकन होतं- चार कोटी 97 लाख रुपये. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. शिंदे कुटुंबाने वारंवार जिल्हाधिकारी, वन विभाग, रेल्वे विभागाशी संपर्क साधला. परंतु कोणीही त्यांना या झाडाचा मोबदला मिळवून देऊ शकलं नाही. अखेर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कायदेशीर लढाई सुरू केली.
दरम्यान, न्यायालयाने मध्य रेल्वेला झाडाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले. त्यापैकी 50 लाख रुपये शिंदे कुटुंबाच्या खात्यात जमा करण्यास सांगितले असून ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आलीये. याशिवाय झाडाचे योग्य मूल्यांकन करून उर्वरित रक्कमही शिंदेंना देण्याचे निर्देश कोर्टानं दिलेयत. त्यामुळं 10 वर्षानंतर शिंदेंच्या रक्त चंदनाच्या संघर्षाला यश मिळाले.