The dispute over Narayan Gad in Beed-बीड (Beed) जिल्ह्यात धार्मिक गडांचे प्रस्थ आहे. गहिनीनाथ गड, मच्छिंद्रनाथ गड, भगवानगड, नारायणगड असे नावाजलेले गड आहेत. हे गड धार्मिक, समाजकारण आणि राजकारणांमुळे चर्चेत येतात. गेल्याच वर्षी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी या गडावर (Narayan Gad) दसरा मेळावा घेऊन मराठ्यांची ताकद दाखवून दिली होती. मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला ही तोड होती. तेव्हा हा गड राज्यात चर्चेत आला होता. हा गड पुन्हा चर्चेत आलाय. परंतु तो वादामुळे चर्चेत आलाय. या गडाचे महंत शिवाजी महाराज व दोन ट्रस्टीमध्ये कशावरून वाद सुरू आहे हे जाणून घेऊया…
वादाचे कारणे जाणून घेण्यापूर्वी या गडाबाबतची थोडी माहिती घेऊया…नारायण गड हे तीर्थक्षेत्र असून, हा गड डोंगरावर आहे. नारायण गडाला महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणूनही ओळखले जाते. बीड शहरापासून 21 किलोमीटरवर हा गड आहे. या गडावर श्री नगद नारायण महाराजांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले होते. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानेही पावण झाल्याचे सांगितले जाते. या गड्याच्या भोवती असलेल्या गावांमध्ये मराठा समाज जास्त आहे. त्यामुळे गडावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे. परंतु इतर सर्व समाजातील लोक या गडाला मानतात. या गडाची आळंदी, पंढरपूर, पैठण येथे जागा असून, तेथे इमारती आहेत. तर एक शिक्षण संस्था आहे.
उत्तराधिकारी नेमल्यावरूनच वाद उफाळला
सध्याचे या गडाचे महंत शिवाजी महाराज हे आहेत. ते नववे मठापती होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून दहा मठापती, महंत म्हणून संभाजी महाराज यांची नियुक्ती केले. संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांचे शिष्यबरोबर नात्याने भाचेही आहेत. संत-महंत, गडाचे विश्वस्त यांच्या उपस्थित संभाजी महाराज यांना गादीवर बसविण्याचा निर्णय मार्च महिन्यात झाला होता. त्यानंतर महिन्याभराने वीस ते पंचवीस गावातील लोकांनी या निवडीला विरोध दर्शविला. महंत शिवाजी महाराजांवर घराणेशाहीचा आरोप केला. त्यात दोन ट्रस्टी बळीराम गवते व भानुदास जाधव यांनी गावकऱ्यांची बाजू घेतली. ( (Narayan Gad))
ट्रस्टींकडून टेंडरसाठी गडाची बदनामी: शिवाजी महाराज
त्यावर गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी गडावर महादेव बाबांची पुण्यतिथीच्या दिवशीच दोन ट्रस्टींवर आरोप केले. हे आरोप अर्थात ट्रस्टी बळीराम गवते व सीए भानुदास जाधव यांच्यावर होते. स्वर्गीय विनायक मेटे यांच्या प्रयत्नामुळे गडाला 25 कोटी निधी मंजूर झाला होता. तर मनोज जरांगे यांच्या प्रयत्नामुळे हा निधी प्रशासनाकडून वर्ग झाला होता. या विकासकामांचे टेंडर दिले नाही म्हणून नवले व जाधव हे गडाची बदनामी करत असल्याचा आरोप महंत शिवाजी महाराज यांचा आहे. तसेच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी 2014 पासून जमा केलेले लाखो रुपये कुणाकडे आहे, असा सवाल महंतांनी या दोन ट्रस्टींना केलाय.
महतांचे आरोप ट्रस्टींने फेटाळले
शिवाजी महाराज यांनी केलेले आरोप ट्रस्टी गवते आणि जाधव यांनीही फेटाळले आहेत. महंत म्हणून शिवाजी महाराज यांनीच राहावे, अशी आमची मागणी होती. नंतर दहा-पाच वर्षांनी उत्तराधिकारी नेमावा, असे माझे मत होते. परंतु महाराजांनी कोऱ्या कागदावर आमच्या सह्या घेऊन उत्तराधिकारी नेमला. आमचा नेमलेला उत्तरधिकाऱ्याला विरोध नाही. वीस ते पंचवीस गावांचा विरोध असल्याचे गवते यांनी म्हटले आहे. गडाच्या विकासकामांचे टेंडर गेवराईतील एका ठेकेदाराला दिले असल्याचे महाराजांनीच आम्हाला सांगितले. कामाच्या बदल्यात ठेकेदार गडाला तीन कोटी निधी देणार होता. त्याला आमची हरकत नव्हती, असे गवते यांचा आहे. त्याचा पुरावा आमच्याकडे असल्याचा दावा गवते यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी 36 लाख रुपये पुतळा तयार करणाऱ्याला दिले आहेत. त्यातील अठरा लाख रुपये वर्गणी म्हणून जमा केले होते. उर्वरित रक्कम कुठून आणि कोणी आणली हे महतांनी सांगावे, असा सवाल गवते यांचा आहे. गडाचे ऑडिट अनेक वर्षे झाले नव्हते. पण गडाचा भाविक म्हणून मी ते करून दिले होते, असे ट्रस्टी व सीए भानुदास जाधवांचा आहे.
तर गवते यांनी आपल्यावर आरोप फेटाळताना महतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचा दावा केलाय. त्यामुळे भविष्यात नारायणगडावरील वाद चिघळणार राहणार हे नक्की.