मुंबई : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव (Dharashiva) झाल्यानंतर फक्त शहराचं नामांतर झाले की जिल्ह्याचं असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना संयमाचा सल्ला दिला होता. दानवेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन आता यावरुन पडदा उठला आहे.
राज्य सरकारकडून याबाबत राजपत्र (Gazette) जारी करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून झाल्याचं सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली होती.
40 गद्दार आमदारांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला; ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची टीका
उस्मानाबाद शहराचे धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याप्रमाणे आज उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर जिल्हा असे राज्य सरकारने राजपत्र नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यामुळे आजपासून शहराप्रमाणेच या दोन्ही जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली आहेत. महसूल आणि वन विभागाकडून आज अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 4 च्या पोट कलम (1) चे खंड सहा या अधिकाऱ्यांचा वापर करत जिल्ह्याचं नाव बदलण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.
दरम्यान महसूल आणि वन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या राजपत्रानुसार (Gazette) या निर्णयाबाबत कोणताही आक्षेप असल्यास त्यांना हरकत किंवा सूचना नोंदवता येणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात याबाबत उपरोक्त दिनांकपूर्वी प्राप्त होतील त्या हरकती व सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील, असे आदेशात म्हटले आहे. तसेच सरकराने काढलेला आदेश 27 मार्च 2023 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.