धाराशिव जिल्हा परिषदेत झेडपीच्या अध्यक्षपदी (BJP) भाजप आमदार राणाजगजितसिंह पती यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांची उपाध्यक्षपदी यापूर्वीच निवड झाली होती. तर उत्सुकता लागून रहिलेल्या सभापतींची निवड काल शुक्रवार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या वाट्याला दोन तर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला एक व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक सभापतीपद आलं आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर झालेल्या विशेष सभेत चार सभापतींची निवड करण्यात आली. महायुतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सर्वच घटक पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आलं. अध्यक्ष निवडींनंतर कोणत्या पक्षाला किती वाटा मिळणार? याबाबतची उत्सुकता लागली होती. या निवडीवेळी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांना दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे.
धाराशिवमध्ये शिवसेनेला उपाध्यक्षपद पण तानाजी सावंतांना राणाजगजितसिंह पाटील भारी पडले ?
अर्थ व बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे (भाजप), समाजकल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे (भाजप), कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खरसडे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी पूजा शिंदे (शिवसेना) यांची निवड करण्यात आली. या निवडीतून सत्तास्थापन करताना योग्य समतोल राखण्यात आला आहे. धाराशिव झेडपीतील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आल्यानंतर सभापती पदांसाठी इच्छुक मोठ्या प्रमाणात होते. प्रत्येकानी सभापतिपद आपल्याच वाट्याला यावे यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. तर काही अपक्ष सदस्यांनी पत्नीला भाजपमध्ये पाठवून सभापतीपदावरची दावेदारी कायम ठेवली होती.
दरम्यान या निवडीविषयी उत्सुकता लागून राहिली होती. या विशेष सभेवेळी महाविकास आघाडीकडूनही सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, सभेत झालेल्या मतदान प्रक्रियेत महायुतीच्या उमेदवारांचा 45 विरुद्ध 10 च्या फरकाने विजय झाला. या पदवाटपामुळे जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण आता स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने येत्या काळात आता विकासकामांना गती मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडीकडे लागले होते.
