सहलीवर असलेल्या सदस्यांचा रंगोत्सव; एकमेकांना रंग लावून साजरी केली विजयाची होळी

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास महिना उलटत आला आहे, सत्तेचे समीकरण

Dharashiv Zilla Parishad

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास महिना उलटत आला आहे, सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना आता प्रचंड वेग आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाल्यापासून ‘किंगमेकर’ ठरलेले महायुतीचे नवनिर्वाचित सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर आहेत. सत्तेच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या ‘फिल्डिंग’मध्ये आता होळीचा रंगही मिसळला आहे. बहुमताने सहलीवर असलेले सदस्यांनी एकमेकांना रंग लावत धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या विजयाची होळी मोठ्या आनंदात साजरी केली आहे. या रंगोत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

सहलीवर असलेल्या सदस्यांची ‘राजकीय’ होळी (Dharashiv Zilla Parishad Election) चांगलीच रंगली आहे. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्याबाहेर असलेल्या महायुतीच्या सदस्यांनी होळी आणि धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे केले. सत्तेच्या प्रतीक्षेत असलेल्या या सदस्यांनी एकमेकांना गुलाल लावून आणि रंगांची मुक्त उधळण करत आनंद साजरा केला. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, सदस्यांमधील ही एकजुट विरोधकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. घरापासून लांब असले तरी, ‘नवनिर्वाचित’ सदस्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आता वेग आला आहे. १३ मार्च रोजी अध्यक्ष आणि सभापती पदाचा फैसला होणार आहे. या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने महायुतीच्या बाजूने राजकीय गणिते मांडली जात आहेत. फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी आणि आपला गट अभेद्य राखण्यासाठी महायुतीने आपल्या सदस्यांना थेट निवडीच्या दिवशीच सभागृहात आणण्याची रणनीती आखली आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार सगळी तटबंदी मजबूत ठेवली आहे. ९ फेब्रुवारीच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून सदस्यांना फुटू न देण्याची खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातील एका विरोधी गटाकडूनही काही अपक्ष किंवा नाराज सदस्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळेच ‘सहली’चा हा मुक्काम वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, १३ मार्चला होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

थोडक्यात सांगायचे तर ७ फेब्रुवारीला सुरू झालेला हा राजकीय प्रवास आता १३ मार्चच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तोपर्यंत सहलीवरचे राजकारण आणि रंगांची उधळण सुरूच राहणार असे दिसते. १३ मार्चला धाराशिव जिल्हा परिषदेवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य अर्चना पाटील अध्यक्ष म्हणून विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तानाजी सावंत यांच्या गटाने सत्ता स्थापनेच्या स्पर्धेत मान टाकली असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या जागा या निवडणुकीत कोणताही प्रभाव टाकू शकतील अशा स्थितीत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदा कमळ फुलणार हे आता स्पष्ट आहे. त्यामुळेच सहलीवर असलेल्या साड्यांनी रंगांची मुक्त उधळण करीत विजयाचा गुलाल निवडीपूर्वीच उधळला आहे.

follow us