आईच्या प्रेमासाठी आसुसलेला ‘पंच’, खेळण्यात आईचा स्पर्श; सोशल मीडियावर भावनिक लाट

आईच्या मायेच्या शोधात असलेला पंच हळूहळू सोशल मीडियाचा चेहरा बनला. प्राणीसंग्रहालयाने त्याचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर केली.

  • Written By: Published:
Untitled Design 93

‘Punch’ videos won the hearts of the world : जगात माणूस असो की प्राणी आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली ओळख असते. जन्मानंतरचे पहिले ऊबदार स्पर्श, पहिली सुरक्षितता आणि पहिलं प्रेम आईकडूनच मिळतं. आणि हे फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही; मूक प्राण्यांनाही आईची तितकीच गरज असते. याच भावनेला स्पर्श करणारी एक हृदयस्पर्शी कहाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही कहाणी आहे जपानमधील इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालय येथील एका लहान माकडाची.

26 जुलै 2025 रोजी या प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या या माकडाच्या पिल्लाने जन्मताच एक वेदनादायी वास्तव अनुभवले. त्याच्या आईने त्याला जवळ घेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर इतर माकडांनीही त्याला दूर लोटले. जन्माच्या पहिल्याच क्षणापासून त्याचा प्रवास एकाकीपणाने सुरू झाला. या पिल्ल्याची अवस्था पाहून प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी त्याला वेळेवर अन्न दिले, वैद्यकीय काळजी घेतली आणि मायेने त्याचे संगोपन केले. प्रेमाने त्यांनी त्याचे नाव ठेवले पंच.

आईच्या मायेच्या शोधात असलेला पंच हळूहळू सोशल मीडियाचा चेहरा बनला. प्राणीसंग्रहालयाने त्याचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर केली, ज्यामध्ये तो एकटा बसलेला, एखाद्या मऊ खेळण्याला मिठी मारून बसलेला दिसत होता. त्या खेळण्यात तो जणू आईची ऊब शोधत होता. पंच जसजसा मोठा होत गेला, तसतसा तो पुन्हा पुन्हा आपल्या आईकडे आणि इतर माकडांकडे जाण्याचा प्रयत्न करत असे. मात्र, प्रत्येक वेळी त्याला हाकलून लावले जात होते. घाबरलेला पंच पुन्हा आपल्या खेळण्याकडे धाव घेत असे आणि त्यालाच बिलगून शांत होत असे. त्या खेळण्याने त्याला सुरक्षिततेची आणि आधाराची जाणीव दिली.

माझ्या हातून फक्त एक हत्या झाली; माजी भाजप खासदाराच्या कबुलीने नव्या वादाला तोंड फुटणार?

पंचचे हे व्हिडिओ जगभरातील लोकांच्या मनाला भिडले. अनेकांनी त्याच्यात स्वतःचे बालपण, स्वतःचे एकटेपण आणि आईच्या प्रेमाची आस पाहिली. काहींनी त्याला दत्तक घेता आले असते तर किती बरे झाले असते, अशी भावना व्यक्त केली. सोशल मीडियावर पंचचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र ही कहाणी केवळ दुःखाची राहिली नाही.

प्राणीसंग्रहालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि काळजीपूर्वक केलेल्या पुनर्वसन प्रक्रियेमुळे पंच आता हळूहळू इतर माकडांमध्ये मिसळू लागला आहे. सुरुवातीला सावध असलेली इतर माकडे आता त्याच्याशी खेळू लागली आहेत, त्याला जवळ घेत आहेत. काहींनी तर त्याला मिठी मारून आपुलकी दाखवली आहे. आज पंच पूर्णपणे एकटा राहिलेला नाही. एकेकाळी आईच्या मायेची आस लावून खेळण्याला बिलगून बसणारा हा छोटा जीव आता आपल्या समूहात स्थान मिळवत आहे.

आईची गरज, आपुलकीची ताकद आणि स्वीकाराची शक्ती पंचची ही कहाणी आपल्याला हेच सांगते की प्रेम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी एकाकीपणावरही मात करता येते.

follow us