Download App

NDA सरकार पण, मराठवाडा राहिला कोरडाच; कराडांना वगळलं, भुमरेंचीही पाटी कोरी..

कोकण आणि मराठवाड्याची पाटी यंदा कोरी राहणार असल्याचे दिसत आहे. यंदा मंत्रिपदासाठी मराठवाड्याचा विचार झालेला नाही.

Maharashtra Ministers in Modi Cabinet : लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने निकाल देऊन टाकल्यानंतर आता एनडीए सरकार अस्तित्वात येणार आहे. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर आणखीही काही खासदार शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रातील खासदार असतील. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उत्तर महाराष्ट्र येथील खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. पण, कोकण आणि मराठवाड्याची पाटी यंदा कोरी राहणार असल्याचे दिसत आहे. यंदा मंत्रिपदासाठी मराठवाड्याचा विचार झालेला नाही. मागील सरकारमध्ये डॉ. भागवत कराड अर्थ राज्यमंत्री होते यंदा त्यांचाही विचार भाजप नेतृत्वाने केलेला नाही.

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची मोठी पिछेहाट झाली. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात फक्त छत्रपती संभाजीनगर येथेच शिंदे गटाचे संदिपान भुमरे विजयी झाले. अन्य जिल्ह्यांतून महायुती हद्दपार झाली. यंदा अख्ख्या मराठवाड्यात एकही खासदार भाजपाचा नाही अशी परिस्थिती आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे मागील सरकारमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते. या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.  त्यामुळे दानवे आता मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. बीड मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

नारायण राणे, कराडांना डच्चू; फ्यूचर पॉलिटिक्स साधत ‘या’ नेत्यांना मंत्रिपदाची संधी

परभणी मतदारसंघात संजय जाधव यांनी महादेव जानकरांचा पराभव केला. तर नांदेड मतदारसंघात अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊनही काहीच फायदा झाला नाही. येथे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाचा धक्का बसला. येथून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण विजयी झाले. लातुरातही महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. अशा पद्धतीने मराठवाड्यातून भाजप जवळपास हद्दपारच झाला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रुपात महायुतीला छत्रपती संभाजीनगरची जागा मिळाली. या पराभवामुळे येथे मंत्रिपद कुणाला द्यायचे याचा प्रश्न उद्भवत नव्हता. संदिपान भुमरे यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. परंतु, शिंदे गटाने बुलडाण्यातील अनुभवी नेते प्रतापराव जाधव यांचं नाव पुढं केलं. त्यामुळे भुमरे यांचं नाव मागे पडलं. निवडणुकीच्या काळात डॉ. भागवत कराड यांच्याकडे परभणी, हिंगोलीसह आणखी काही मतदारसंघांची प्रभारी म्हणून जबाबादारी देण्यात आली होती. मात्र या सगळ्याच मतदारसंघात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांना यंदा संधी मिळाली नाही असे सांगण्यात येत आहे.

Pune News : पुण्याचे महापौर ते केंद्रीय मंत्री.. दोन वर्षात मोहोळांची गरुडझेप

नारायण राणेंना डच्चू

दरम्यान, या निवडणुकीत कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजप नेते नारायण राणे यांनी विजय मिळवला. मागील सरकारमध्ये राणे मंत्री होते. त्यांना यंदाही संधी मिळेल अशी शक्यता होती. परंतु, भाजपने त्यांचा विचार केल्याचं दिसत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे दिसणार नाहीत. दुसरीकडे मुंबईतून भाजपने पुन्हा पियूष गोयल यांना संधी दिली आहे.

follow us

वेब स्टोरीज