Beed Tiger : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून (Beed) वाघाच्या वावराची चर्चा सुरू असून, आता त्याची आष्टी वनक्षेत्रातील उपस्थिती समोर आली आहे. पाटोदा परिसरात दिसणारा हा वाघ 2 नोव्हेंबर रोजी सौताडा ग्रामपंचायतीजवळील भुरेवाडी परिसरात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला. वन विभागाने या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून वाघाच्या हालचालींवर विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे.
या वाघाचा जन्म 2022 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात झाला असून, त्याची आई T-22 ही वाघीण आहे. वयाने मोठा झाल्यानंतर स्वतंत्र अधिवासाच्या शोधात हा वाघ मूळ जंगलाबाहेर पडला. त्यानंतर चंद्रपूर, धाराशिव, लातूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतून प्रवास करत तो बीडमध्ये पोहोचला. या प्रवासादरम्यान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कारी परिसरातही त्याची उपस्थिती नोंदवण्यात आली होती. अन्न आणि सुरक्षित अधिवासाच्या शोधात वाघांकडून एका जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतर केले जाते.
बीडचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अमोल मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबरला भुरेवाडी परिसरातील कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र मिळाले. यापूर्वी तो पाटोदा तालुक्यात दिसला होता. ऑक्टोबरच्या मध्यातही त्याने पाटोदा परिसरात हजेरी लावली होती. 17 ऑक्टोबर रोजी सगलेवाडी आणि जरेवाडी येथे त्याने दोन पाळीव जनावरांची शिकार केली होती. त्यानंतर नायगाव मयूर अर्थात पीकॉक अभयारण्यातील एका जलस्रोतावर पाणी पितानाचे छायाचित्रही समोर आले होते. आता पुन्हा आष्टी वनक्षेत्रात त्याचा वावर आढळल्याने वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळात बीड जिल्ह्यात या वाघाची उपस्थिती दुसऱ्यांदा नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी पाटोदा परिसरात दिसलेला वाघ आता आष्टीच्या जंगलात पोहोचल्याने त्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवले जात आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, जवळपास शंभर वर्षांनंतर बीड जिल्ह्यात वाघाचे अस्तित्व नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी जंगलाच्या कडेला जाणे टाळावे, तसेच वाघ दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न करता वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
