छत्रपती संभाजीनगरात दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; ढाब्यावर कुक, वेटर म्हणून करत होते काम

दोघांकडं भारतात प्रवेशासाठी आवश्यक पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य वैध प्रवासी कागदपत्रं नसल्याचं आढळून आलं आहे.

News Photo   2026 08 17T151043.950

छत्रपती संभाजीनगरात दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; ढाब्यावर कुक, वेटर म्हणून करत होते काम

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी (Police) बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करून वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना मांडकी शिवारातून ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि चिकलठाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत इमानदार ढाब्यावर काम करणाऱ्या या दोघांना पकडलं. दोघांकडं बांगलादेश सरकारचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि जन्मप्रमाणपत्र आढळल्याने त्यांच्या नागरिकत्वाबाबतचा संशय दूर झाला.

मोहम्मद बिलाल मोहम्मद मुकलिसउद्दल रेहमान (२७) आणि मोहम्मद रासेल मोहम्मद इरशाद अली (१९) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत. दोघंही बांगलादेशातील झिनायदा जिल्ह्यातील महेशपूर परिसरातील रहिवासी असून, सध्या मांडकी-पळशी परिसरात राहत होते. ढाब्यावर एकजण कुक, तर दुसरा वेटर म्हणून काम करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

11 ऑगस्ट रोजी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मांडकी शिवारात काही परदेशी नागरिक संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि चिकलठाणा पोलिसांनी ढाब्यावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं. सुरुवातीच्या चौकशीत त्यांनी स्वतःला भारतीय नागरिक असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांच्या बोलण्यावरून संशय निर्माण झाल्यानंतर कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी दोघांनी आपण बांगलादेशचे नागरिक असल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मुद्दे वाढवू नका अन् मुद्दे भरकटवू नका; छ. संभाजीनगरात आंदोलनात दिपकेंसमोर DCP नवलेंचं वक्तव्य

पोलिसांनी त्यांच्या मोबाइल फोनसह कागदपत्रांची तपासणी केली असता बांगलादेश सरकारचं जन्मप्रमाणपत्र आणि तेथील नातेवाइकांशी संपर्क असल्याचे पुरावे मिळाले. चौकशीत मोहम्मद बिलालने 2017-18 च्या सुमारास दलालाच्या मदतीने भारत-बांगलादेश सीमा बेकायदेशीररीत्या ओलांडल्याचं सांगितलं. त्यानंतर कोलकाता, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे काम केल्याचं, तसंच कोविड काळात बांगलादेशात परतल्यानंतर पुन्हा भारतात आल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.

दुसरीकडं, मोहम्मद रासेलनेही सुमारे पाच वर्षांपूर्वी अनधिकृतरीत्या भारतात प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर कोलकाता, मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात विविध ठिकाणी काम केल्याचं तपासात निष्पन्न झालं. दोघांकडं भारतात प्रवेशासाठी आवश्यक पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य वैध प्रवासी कागदपत्रं नसल्याचं आढळून आलं आहे. भारतातील त्यांचा वास्तव्याचा कालावधी, रोजगार, निवासस्थाने आणि स्थानिक संपर्कांची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे.

दरम्यान, दोघांच्या नागरिकत्वाची अधिकृत पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, Immigration and Foreigners Act, 2025 मधील लागू तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे. सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करून दोघांना बांगलादेशात हद्दपार करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, हॉटेल, ढाबा चालक आणि घरमालकांनी परराज्यातून किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींना काम अथवा निवास देताना त्यांच्या ओळखपत्रांसह आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी, तसंच संशयास्पद वास्तव्य आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असं आवाहन ग्रामीण पोलिसांनी केलं आहे.

Exit mobile version