छत्रपती संभाजीनगर : “भागवत कराड असो की भाजपचा (BJP) कोणताही उमेदवार असो. त्याला निवडून येण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावचं लागतं, असं म्हणतं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एक प्रकारे भाजप आणि एमआयएम (MIM) छुप्या युतीची जाहीर कबुलीच दिली. “दिशा” जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती छत्रपती संभाजीनगरची बैठक नुकतीच संपन्न झाली, यानंतर दानवे बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. (Union Minister and BJP leader Raosaheb Danve publicly admitted the secret alliance between BJP and MIM)
राज्याच्या राजकारणात निवडणुकांवेळी एमआयएम म्हणजे भाजपची बी टीम, भाजप आणि एमआयएमची छुपी युती आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात असते. त्यावर अशी कोणतीही बी टीम, सी टीम नसल्याचे सांगत भाजपकडून या टीकेला प्रत्तुतर दिले जाते. मात्र आज पहिल्यांदाच रावसाहेब दानवे यांनी भाजप- एमआयएम युतीची जाहीर कबुलीच दिली. दानवे यांच्या या विधानानंतर उपस्थित जलील यांच्यासह सर्वच पत्रकार मनमुराद हसले. पण दानवे यांच्या कबुलीची राज्याच्या राजकारणात आता एकच जाहीर चर्चा होत आहे.
लोकसभेच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरु केली आहे. इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमच्या पक्षातूनही पाच ते सहा जण इच्छुुक आहेत. तुमचं मत काय आहे? असा प्रश्न एका उपस्थित पत्रकाराने विचारला. यावर उत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले, आमच्या पक्षामध्ये उमेदवार ठरवण्याची एक प्रक्रिया आहे. राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड काही उमेदवारांची यादी करून केंद्राकडे पाठवते. त्यानंतर केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेऊन उमेदवाराची घोषणा करतात. त्यामुळे उमेदवारी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. यावर पत्रकाराने प्रतिप्रश्न करत विचारले की, या सगळ्यात तुमच्यात, शिवसेनेत आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात वादावादी सुरु आहे, त्याचे काय? या वादा वादीच्या बातम्या फक्त वर्तमानपत्रात आहेत. प्रत्यक्षात आमच्यात काही नाही, असं त्यांनी सांगितलं.
यानंतर पत्रकाराने मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील विधानाबद्दल दानवे यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, मी यापूर्वी अनेकदा भाषणात सांगितलं आहे की, उत्तर प्रदेशमध्ये मायावती, तमिळनाडूमध्ये जयललिता, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी आतापर्यंत स्वबळावर सरकार आणली आहेत. पण कोणताही प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात आतापर्यंत स्वबळावर सरकार आणू शकला नाही ही गोष्ट खरी आहे, असं सांगितलं. तसंच दिलीप वळसे पाटील जे बोलले त्यात काय चुकीचं आहे? आपल्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षाला कोणाला ना कोणाला सोबत घेतल्याशिवाय किंवा गेल्याशिवाय तिथे सरकार आलेलं नाही.
आता हेच सगळे मिळून आम्हाला जातीयवादी म्हणतात. पण मला सांगा, मायावती मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री, यानुसार दोनवेळा त्या मुख्यमंत्री झाल्या. नितीश कुमार अटलजीच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वेमंत्री होते, आता आमच्या जास्त जागा असूनही त्यांना मुख्यमंत्री केलं. पण तेही आता आम्हाला जातीवादी म्हणतात. उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होते. जयललिता यांनी एका निवडणुकीत आमच्याशी युती केली होती. शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणतात. पण 1985 मध्ये शरद पवार आणि भाजप एकत्र निवडणूक लढले होते. ममता बॅनर्जी आम्हाला जातीवादी म्हणतात, पण त्याही वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या. राजकारण बदलत असतात त्याप्रमाणे ते म्हणतात. पण काही झालं तर 2024 ला भारतीय जनता पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
यानंतर पत्रकाराने रावसाहेब दानवे यांना शेजारी बसलेल्या जलील यांच्याबद्दल प्रश्न विचारला. जलील साहेब राहिले ना? त्यावर दानवे म्हणाले, ते आमची दोस्ती आहे रे. पुन्हा पत्रकारांना म्हटले, म्हणजे ते पुन्हा येतील? एवढ्यात पाठिमागून जलील यांनी “आम्ही पुन्हा येऊ” असं म्हंटलं. यावर रावसाहेब दानवेंसह सर्वच जण खळखळून हसले. त्यावर पत्रकाराने विचारले, इथे तर भागवत कराड इच्छा व्यक्त करत आहेत. दानवे म्हणाले, अरे चुकीच काय आहे? इच्छा व्यक्त केल्याशिवाय तिकीट मिळत का? तु ही इच्छा व्यक्त कर, तुला कोण नाही म्हंटलं. सोड हे सगळं.
पत्रकाराने आणखी हसत म्हंटले की, मग तुमची दोस्ती तुटून जाईल ना. त्यावर दानवे म्हणाले, अरे दोस्ती म्हणजे आमची वेगळी दोस्ती आहे. पत्रकार म्हंटले, गळाभेटवाली दोस्ती आहे ना? दानवे म्हणाले, नाही. भागवत कराड असो की भाजपचा कोणताही उमेदवार असो. त्याला निवडून येण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावचं लागतं, असं म्हणतं एक प्रकारे भाजप आणि एमआयएम छुप्या युतीची जाहीर कबुलीच दिली. दानवे यांच्या या विधानानंतर उपस्थित जलील यांच्यासह सर्वच जण मनमुराद हसले. पण दानवे यांच्या विधानाची आता एकच जाहीर चर्चा होत आहे.